विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी तामिळनाडूत भाजपला सुरुंग, मित्रपक्षाने दिला धक्का

तामिळनाडूत येत्या २७ फेब्रुवारी रोजी विधानसभा पोटनिवडणूका पार पडणार आहेत. परंतु निवडणुकीआधी भाजपा आणि त्यांचा मित्र पक्ष असलेल्या एआयएडीएमके (ईपीएस गट) यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. दक्षिणेतील तामिळनाडूतही एका मित्र पक्षाने भाजपसोबतची मैत्री मोडण्याचे संकेत दिले आहेत. इरोड पूर्व विधानसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी ईपीएसने आपला मित्रपक्ष भाजपपासून दुरावल्याचे सांगितले जात आहे. पक्ष कार्यालयात लावण्यात आलेल्या निवडणुकीच्या पोस्टरमधून भाजप आणि भाजप नेत्यांचे चेहरे गायब होते. पोस्टरमध्ये पीएम मोदींचेही नाव नाहीये.

युतीचे नाव देखील भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)वरुन बदलून ‘राष्ट्रीय लोकशाही पुरोगामी आघाडी’ असे करण्यात आले आहे. या बदलावर भाजपनं मौन पाळल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी याला नक्कीच उत्तर दिले जाईल, असे सांगितले आहे.

एआयएडीएमकेच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमाशी बोलताना सांगितले की, ईपीएसने भाजपला स्पष्ट संदेश दिला आहे. त्यांनी तामिळनाडूतील स्थिती जाणून घेतली पाहिजे. राज्याच्या राजकारणात ईपीएस आणि भाजप यांच्यातील ही राजकीय भांडणं जयललिता यांच्या निधनानंतर सुरु झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत २३४ पैकी ४ जागा जिंकल्यानंतर भाजपाने स्वत:ला मुख्य विरोधी पक्ष म्हणून घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे तामिळनाडूत भाजप आणि ईपीएसच्या वादाला सुरूवात झाली आहे.

एआयएडीएमके पक्षामध्ये दोन गट आहेत. त्यातील एका पक्षाचं नाव ओ. पन्निरसेल्वम (ओपीएस) आहे. तर दुसऱ्या गटाचं नाव ई. पलानीस्वामी (ईपीएस) आहे. येथे भाजपा ईपीएस गटासोबत आघाडीमध्ये आहे. मात्र, ईरोडमधील निवडणुकीत ओपीएसने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे भाजपाकडे पाठिंब्याची मागणीही केली आहे. परंतु भाजपने आपला उमेदवार रिंगणात उतरल्यानंतर आपण उमेदवार मागे घेणार असल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, ओपीएसच्या या विधानामुळे ईपीएस आणि भाजप यांच्यातील दीर्घकाळ चाललेला वाद चव्हाट्यावर आला आहे.


हेही वाचा : SSC-HSC Exam : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचा ‘हा’ मोठा निर्णय