निर्यात होणाऱ्या औषधांची होणार तपासणी; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संकेत

संग्रहित छायाचित्र

 

नवी दिल्लीः परदेशात निर्यात होणाऱ्या औषधांची तपासणी केली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय याबाबत विचार करत आहे. यासाठी औषध विभाग व विदेशी व्यापार महासंचालक DGFT यांच्याशी सल्लामसलत केली जाणार आहे. त्यानंतर हा निर्णय जाहिर करण्यात येईल.

निर्यातीचा परवाना मिळाल्यानंतर परदेशात औषध पाठवता येतील, असा केंद्र सरकारचा नियम आहे. या नियमांत बदल करण्याचा विचार केंद्रीय आरोग्य मंत्रालय करत आहे. यासाठी नवीन धोरण आखले जाणार आहे. निर्यात होणाऱ्या औषधांची आधी स्थानिक किंवा मुख्य लॅबमध्ये तपासणी केली जाईल. निर्यात होणाऱ्या औषधांचा दर्जा तपासला जाईल. त्यानंतर औषधे निर्यात करण्यास परवानगी दिली जाईल, असा नियम करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे.

पश्चिम आफ्रिकन देशातील गॅम्बियामध्ये भारतीय औषध कंपनीने तयार केलेल्या सर्दी-खोकल्याचे सिरप प्यायल्याने ६६ बालकांचा मृत्यू झाल्याची घटना गेल्यावर्षी घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. जागतिक आरोग्य संघटनेने या सिरपचा वापर न करण्याचा इशारा दिला. इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने तयार केलेल्या ४ कफ सिरपबाबत अलर्ट जारी करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत या प्रकरणाची चौकशी केली.

मेडेन फार्मास्युटिकल्सच्या चार खोकला आणि सर्दी सिरपची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. यामध्ये अति प्रमाणात डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचे प्रमाण आढळून आले. जे माणसांसाठी अत्यंत धोकादायक आहेत, असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला. हे कफ सिरप हरियाणातील एका कंपनीत तयार केले जात आहे, अशीही माहिती समोर आली.

त्यानंतर गॉम्बिया, अमेरिका, नेपाळमध्ये भारतीय औषधांवर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून भारतीय आरोग्य मंत्रालय निर्यात होणाऱ्या औषधांसाठी नवीन नियम तयार करण्याचा विचार करत आहे. त्यानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निर्यात होणाऱ्या औषधांची तपासणी करण्यावर चर्चा सुरू केली. औषधांचे मानांकन ठरवणाऱ्या संस्थेचे मतही जाणून घेण्यात येणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.