विमानप्रवासातील मास्कसक्ती मागे, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून नियम शिथिल

नवी दिल्ली : विमानप्रवास करताना मास्कचा वापर करण्याची सक्ती केंद्र सरकारने शिथिल केली आहे. त्यामुळे यापुढे विमान प्रवासादरम्यान मास्क वापरणे अनिवार्य नाही. तथापि, प्रवाशांनी खबरदारी म्हणून मास्कचा वापर करावा, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे सरकारने बुधवारी जारी केले आहेत. कोरोना महामारीच्या काळात विमान प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले होते.

देशात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात विमानतळावर व विमानांमध्ये प्रवासी व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले होते. पण आता हे बंधन शिथिल करण्यात आले आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान प्रवासादरम्यान मास्क वापरणे आता बंधनकारक नाही. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, त्याचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे प्रवाशांनी खबरदारी म्हणून मास्कचा वापर केला पाहिजे, असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने बुधवारी सांगितले. आतापर्यंत विमानप्रवासादरम्यान मास्क किंवा फेस कव्हर वापरणे अनिवार्य होते. पण आता मंत्रालयाने विमान कंपन्यांना पत्र पाठवून ही अट शिथिल केल्याचे म्हटले आहे.

फ्लाइटमध्ये केल्या जाणाऱ्या घोषणांमध्ये देखील फक्त कोविडचा धोका लक्षात घेता सर्व प्रवाशांनी मास्क किंवा फेस कव्हरचा वापर करावा, एवढाच उल्लेख करावा. दंड किंवा दंडात्मक कारवाईचा कोणताही संदर्भ या घोषणांमध्ये देण्याची आवश्यकता नाही, असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशातील एकूण सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या एकूण संसर्गाच्या केवळ 0.02 टक्का आहे आणि कोरनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 98.79 टक्क्यांवर पोहोचले आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,41,28,580 वर पोहोचली असून मृत्यूदर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे.