चिंताजनक! भारतात आढळले ‘फॉल्स निगेटिव्ह’ कोरोना रुग्ण

देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तीन दिवसांत १४४३ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.

red zone

देशात कोरोना संसर्गाचा प्रसार होत असताना कोरोनाची लक्षणं नसलेले रुग्ण आढळून आल्याने सरकारची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली की देशातही आता लक्षणं नसलेले कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, ही चिंतेची बाब आहे. अशा रूग्णांकडून संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. कोरोनाची लक्षणं न दिसणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांना ‘फॉल्स निगेटिव्ह’ म्हणतात. जगात असे ३० टक्के रुग्ण आढळले आहेत. मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनीही आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये संसर्ग पसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, आरोग्य कर्मचार्‍यांना सुरक्षित राहण्याचे प्रशिक्षण दिलं जात आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने ‘दीक्षा’ नावाचा प्रशिक्षण विभाग तयार केला आहे. याच्या माध्यमातून नर्सिंग स्टाफ आणि सर्व स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तीन दिवसांत १४०० हून अधिक रुग्ण वाढले

देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तीन दिवसांत १४४३ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. २४ तासांत ७७३ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, दोन दिवसांत ३८ लोक मरण पावले. देशात कोरोना रुग्णांची संख्या आता ६,२१७ आहे. १८४ लोकांनी आपला जीव गमावला आहे. उपचारानंतर ५६९ रूग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की, संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने राज्यांसोबत काम करत आहे. आमचा प्रयत्न हा संसर्ग तोडण्याचा आहे. म्हणूनच राज्यांमधील हॉटस्पॉट भागात जास्त लक्ष देत आहोत.


हेही वाचा – Coronavirus:…अन् असा पसरला अमेरिकेत कोरोना

हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची कमतरता नाही

कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (एचसीक्यू) औषधाबद्दल अग्रवाल म्हणाले की, देशात औषधाची कमतरता नाही आणि भविष्यातही होणार नाही. हे औषध लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. विशेष म्हणजे सरकारने निर्यातीवरील बंदी उठविली आहे.

पुढील चार दिवसांत संख्या १० हजारांवर पोहोचू शकते

आठवड्याच्या शेवटी अर्थात उर्वरित चार दिवसात कोरोना रूग्णांची संख्या १० हजारांपर्यंत पोहोचू शकते. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार दोन दिवसांत रुग्णांची संख्या ३४ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र मागील दोन दिवसांच्या तुलनेत ही वाढ सर्वात कमी आहे. या कालावधीत ४० टक्के वाढ दिसून आली आणि हा आकडा ३,५७७ वर पोहोचला. बुधवारी सायंकाळपर्यंत रुग्णांची संख्या पाच हजारांच्या वर जाईल, असा अंदाज वर्तविला जात होता पण दुपारपर्यंतच कोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराच्या वर पोहोचली. लॉकडाऊच्या १५ दिवसानंतरही संसर्ग वाढत आहे. चार दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पट होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा थेट परिणाम रुग्णालयांवर होईल. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर चाचणीची संख्या वाढली तर संक्रमित लोकांची संख्याही वाढेल.


हेही वाचा – “… तुझे हातपाय मोडले असते”; पोलीस अधिकाऱ्याची आव्हाडांना धमकी