Ayoddhya : राम मंदिराच्या खाली टाईम कॅप्सूल? मंदिर ट्रस्टनं केला खुलासा!

time capsule
प्रातिनिधिक छायाचित्र

‘राम मंदिराचं बांधकाम होणार असलेल्या ठिकाणी जमिनीत २ हजार फुटांवर एक टाईम कॅप्सूल पुरण्यात येणार आहे. भविष्यात कधी राम जन्मभूमी (Ram Janmabhoomi) किंवा राम मंदिराच्या (Ram Mandir) ठिकाणावरून आणि त्याच्या इतिहासावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले, तर त्यावेळी ही टाईम कॅप्सूल योग्य माहिती पुरवेल’, असं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं आणि सगळ्यांनाच उत्सुकता लागली की नक्की ही टाईम कॅप्सूल असणार तरी काय? तिच्यामुळे तिच्यावरच्या बांधकामाचा इतिहास कसा कळेल? पण आता ही टाईम कॅप्सूल वगैरे सगळ्या अफवाच असल्याचं स्पष्ट झालं आहे. खुद्द राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चम्पत राय यांनीच हे छातीठोकपणे सांगितलं आहे. त्यामुळे आता या अस्तित्वातच नसलेल्या टाईम कॅप्सूलवरून उठलेली अफवांची राळ शांत झाली आहे. मात्र, या अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन चम्पत राय यांनी केलं आहे.

दोनच दिवसांपूर्वीचं Time Capsule बाबतचं वक्तव्य

५ ऑगस्ट रोजी राम मंदिरासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेवर राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची आणि त्यापुढे बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराची मोठी उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. मात्र, त्याआधीच या भूमिपूजनावेळी अशी टाईम कॅप्सूल (Time Capsule) जमिनीत पुरली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य असलेल्या कामेश्वर चौपाल यांनी एएनआयला ही माहिती दिली होती. त्यासंदर्भातलं ट्वीट देखील एएनआयनं केलं होतं.

मात्र, आता कामेश्वर यांचा हा दावा ट्रस्टच्या सचिवांनी खोडून काढला आहे. अशी कोणतीही टाईम कॅप्सूल जमिनीत ठेवली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अयोध्येमधल्या वादग्रस्त जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी अंतिम निकाल देऊन अनेक दशकांपासून सुरु असलेल्या या वादावर पडदा टाकला होता. यामध्ये मशिदीच्या जागेवर राम लल्लाचा दावा न्यायालयाने मान्य करत तिथे मंदिर बांधण्याची परवानगी दिली. तसेच, त्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्याचेही निर्देश दिले. त्यासोबतच, मशिदीसाठी अयोध्येमध्येच मोक्याच्या ठिकाणी ५ एकर जागा देण्याचा देखील निवाडा दिल्यामुळे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. (Ayoddhya Verdict)