Farm Laws : पंजाब-यूपीच्या निवडणुकीत फटका बसेल म्हणून कृषी कायदे रद्द केले; शरद पवारांचा मोदींवर घणाघात

NCP President Sharad Pawar

पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत फटका बसेल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे रद्द केले, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. वर्षभर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून कृषी कायदे आता मागे घेतले हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, असा घणाघात शरद पवारांनी केला. तसंच, कृषी कायद्याबाबत केंद्र सरकारने संसदेत, राज्याबाबत आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली नव्हती, अशी टीका देखील केली.

शरद पवार चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकारला टोला लगावला. कृषी कायद्याबाबत केंद्र सरकारने संसदेत, राज्याबाबत आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली नव्हती. त्यामुळे या कायद्याला विरोध झाला. देशाच्या इतिहासात एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी सीमेवर बसले. थंडी, ऊन, वारा, पावसाचा विचार न करता शेतकरी संघर्ष करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढायला हवा होता. पण त्यांनी हे केलं नाही, असं शरद पवार म्हणाले.

तीनही कृषी कायदे मागे घ्या अशी मागणी शेतकरी संघटनेने केली पण ऐकलं नाही. त्यामुळे हा संघर्ष झाला. उत्तर प्रदेशचा काही भाग तसंच राजस्थान, पंजाब, हरयाणातील लोक या आंदोलनात सहभागी होते. आता पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आल्या आहेत. निवडणूक प्रचारासाठी गावात गेल्यावर शेतकरी जाब विचारतील हे लक्षात आल्यावर केंद्राने कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. उशीरा का होईना शहाणपण आलं, असा केंद्र सरकारला टोला लगावत एक वर्ष संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, असं शरद पवार म्हणाले.