नवी दिल्ली: पंजाबमधील हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली, ज्याला ‘किसान आंदोलन 2.0’ म्हटले जात आहे. ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन जाणाऱ्या या शेतकऱ्यांना हरियाणाच्या शंभू आणि खनौरी सीमेवर थांबवण्यात आले आहे, जिथे आंदोलकांनी जेसीबीपासून माती खोदण्याच्या यंत्रापर्यंत सर्वकाही सोबत आणले आहे. आता आंदोलनात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, या आंदोलनात एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नसल्याचे स्पष्टीकरण हरियाणा पोलिसांनी दिले आहे. (Farmer s Protest Violence again in the farmer s movement The death of a farmer due to a bullet what really happened)
हरियाणा पोलिसांनी सांगितले की, “आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (21 फेब्रुवारी 2024) शेतकरी आंदोलनात एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नाही. ही केवळ अफवा आहे. दाता सिंग-खनौरी सीमेवर दोन पोलीस आणि एक आंदोलक जखमी झाल्याची माहिती आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.” या आंदोलनात त्यांच्या एका मित्राचा मृत्यू झाल्याचा दावा शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी केला होता.
हरियाणा पोलिसांनीही आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे निहंग शेतकरीही हरियाणातील बॅरिकेडिंगजवळ पोहोचून ते हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकरी आंदोलनात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रोहतकचे रहिवासी उपनिरीक्षक विजय कुमार यांना फतेहाबाद टोहानाच्या पंजाब सीमा भागात गस्त घालण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ड्युटीवर असताना त्यांना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या, त्यानंतर ते घरी गेले.
मंगळवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. या आंदोलनात पोलिसांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नसून, याआधीही दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. रोहतकच्या अर्बन स्टेटचा रहिवासी असलेला विजय यापूर्वी नुहानमध्ये तैनात होता. हरियाणाच्या सीमेवर पोलीस आणि शेतकरी यांच्यात चकमक सुरू आहे. पोलिसांनी रबर बुलेटचा वापर करून आंदोलकांना पांगवले. तसेच 25 शेतकरी जखमी झाल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. हिंसाचार होत असतानाही ते आपले आंदोलन शांततापूर्ण होत असल्याचं म्हणत आहेत.
नेमकं घडलं काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी काही शेतकरी पंजाब आणि हरियाणा सीमेला जोडणाऱ्या खनौरी सीमेवरील बॅरिकेड्सकडे जात होते. शेतकरी बॅरिकेड्स तोडून दिल्लीच्या दिशेने कूच करण्याच्या प्रयत्नात होते. शेतकऱ्यांचे हे हिंसक आंदोलन पाहून घटनास्थळी तैनात असलेल्या हरियाणा पोलीस कर्मचाऱ्यांनी मोर्चा सांभाळला. यावेळी त्यांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसंच, आंदोलकांना पांगवण्यासाठी रबरी बुलेट्सचाही वापर करावा लागला.
(हेही वाचा: Jitendra Awhad : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? बुलढाण्यातील विषबाधा प्रकरणावरुन आव्हाड आक्रमक)