Kisan Mahapanchayat: चलो लखनऊ, कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आज लखनऊमध्ये शेतकऱ्यांचं शक्ती प्रदर्शन

Farmers head to Lucknow for today Kisan Mahapanchayat
Kisan Mahapanchayat: चलो लखनऊ, कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आज लखनऊमध्ये शेतकऱ्यांचं शक्ती प्रदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने (SKM) आज लखनऊमध्ये किसान महापंचायत बोलावली आहे. लखनऊच्या इकोगार्डन बंगला बाजारात महापंचायत आयोजित करण्यात आली असून सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. यामध्ये भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकेत, दर्शनपाल, बलबीर सिंह राजेवाल, जोगिंदर सिंह उगराहासह अनेक शेतकरी नेते उपस्थितीत राहणार आहेत.

राकेश टिकेत यांनी ट्वीटद्वारे किसान महापंचायतला उपस्थितीत राहण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. ‘चलो लखनऊ-चलो लखनऊ’ या घोषवाक्यासोबत राकेश टिकेत यांनी रविवारी ट्वीट केले.

दरम्यान काल, रविवार शेतकरी आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाची बैठक पार पडली. जोपर्यंत केंद्र सरकार पिकांच्या किमान आधारभूत किमतीबद्दल (MSP) आश्वासन देत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरुच राहिल, अशी भूमिका या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चाकडून स्पष्ट करण्यात आली. तसेच काल राकेश टिकेत यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय टेनीला अटक करण्याची मागणी हा शेतकरी रॅलीचा सर्वात मोठा मुद्दा असल्याचे सांगितले. याशिवाय इतर मुद्दे देखील आहेत.

२७ नोव्हेंबरला अजून एक संयुक्त किसान मोर्चाची बैठक होणार आहे. तर २९ नोव्हेंबरला शेतकऱ्यांचा मोर्चा संसदेकडे धडक देणार आहे. दरम्यान २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घटनात्मक प्रक्रियेला सुरू केली जाणार आहे.


हेही वाचा – Farm Laws Withdrawn: MSPला कायदेशीर हमी मिळेपर्यंत शेतकरी आंदोलन सुरुच राहणार