Bharat Band: कृषी कायद्यांविरोधात आज ‘भारत बंद’ची हाक,अनेक राजकीय पक्षांचा भारत बंदला पाठिंबा

दिल्ली - अमृतसर, दिल्ली - अंबालसह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून चक्का जाम

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंदची (Bharat Band) हाक दिली आहे.  संयुक्त शेतकरी संघटनेने भारत बंदच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शांतता राखण्याचे आवाहन केले असून सर्व भारतीयांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवहन देखील केले आहे. सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, बाजारपेठा,दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काँग्रेस,आम आदमी पार्टी सोबत देशातील अनेक राजकीय पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. संयुक्त शेतकरी संघटना ज्यात एकूण ४० शेतकरी संघटनांचा समावेश असून त्यांनी रविवारी भारत बंद आंदोलनाची घोषणा केली होती. केंद्र सरकारने आणलेल्या तीन नव्या सुधारित कृषी कायद्यांच्या विरोधात मागील दीड वर्षांपासून दिल्ली बॉर्डरवर देशातील लाखो शेतकरी आंदोलन करत आहे. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे.

आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पंजाब – हरियाणातील शंभू बॉर्डर देखील दुपारी ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दिल्लीतील अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरुन त्यांनी अनेक महामार्ग रोखले आहे. शेतकऱ्यांनी हरियाणाज कुरुक्षेत्र येथील शहाबाद परिसरातील दिल्ली – अमृतसर हा राष्ट्रीय महामार्ग तसेच पटना- आरजेडी कार्यकर्त्यांनी भारत बंदला पाठिंबा देत गांधी सेतू रस्ता देखील अडवला आहे.

दिल्ली,यूपी आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांची भारत बंद विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. दिल्लीतील गाजीपुर बॉर्डर,भंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्याचप्रमाणे दिल्ली – अमृतसर, दिल्ली – अंबालसह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून चक्का जाम करण्यात आला आहे.

भारत बंदला ‘या’ पक्षांचा पाठिंबा

देशातील अनेक राजकीय पक्षांनी आज भारत बंदला पाठिंबा दिला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक,क्रांतिकारी समाजवादी पक्ष तसेच आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी,तेलुगू देसम पार्टी,जनता दलासारख्या डाव्या पक्षांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दिलाय. तसेच बहुजन समाज पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,द्रविड मुन्नेत्र कळघम, युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा,राष्ट्रीय जनता दल,स्वराज इंडिया या पक्षांनी देखील भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

दिल्ली पोलिसांना अलर्ट

दिल्ली पोलिसांनी आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर १५ जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. दिल्ली बॉर्डर, नवी दिल्लीतील अनेक ठिकाणी तसेच लालकिल्याच्या आजूबाजूच्या परिसरात पोलीस फोर्स आणि पॅरामिलिट्री तैनात करण्यात आली आहे. भारत बंदचा दिल्ली मेट्रो आणि रेल्वेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने बॉर्डर परिसरातील मेट्रो स्टेशन आणि नवी दिल्ली परिसरातील मेट्रो स्टेशनवर CISF, DMRC दिल्ली पोलिसांसोबत अलर्ट राहतील,असे मेट्रो डीसीपींकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – दिल्लीत आजी माजी मंत्र्यासोबत ठाकरे शहा यांची स्नेहभोजनच्या आड गुफ्तगू