Homeदेश-विदेशFarmers Protest : बोलणी पुन्हा फिस्कटली, शेतकऱ्यांचे आज 'चलो दिल्ली'

Farmers Protest : बोलणी पुन्हा फिस्कटली, शेतकऱ्यांचे आज ‘चलो दिल्ली’

Subscribe

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये झालेली बैठक पुन्हा एकदा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मागण्या लवकर मान्य करा अन्यथा दिल्लीत येऊन चक्काजाम करू, असा इशारा शेतकऱ्यांनी आधीच दिला होता. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं आंदोलन रोखण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. (Delhi Farmers Protest news farmers arrived with jcb and poklane machines in shambhu border)

हेही वाचा – Sharad Pawar : इंडिया आघाडीतील घटक पक्षांना शरद पवारांचे आवाहन, म्हणाले…

आंदोलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. मात्र, यासाठी सरकारने आम्हाला शांततेने दिल्लीला जाण्याची परवानगी द्यावी. आमच्या शेतकरी आणि मजुरांवर अत्याचार होता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हा प्रश्न सोडवावा. केंद्राने आमचे म्हणणे ऐकून घेतल्यास प्रश्न शांततेने सोडवला जाईल, असे शेतकरी नेते सरवनसिंह पंढेर यांनी म्हटले आहे.

शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत आतापर्यंत चार बैठका झाल्या. या बैठकांमध्ये केंद्राने शेतकऱ्यांसमोर काही प्रस्ताव ठेवले. मात्र, हे प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी अमान्य केले. त्यामुळे सरकारसोबत चर्चा करण्यात आता काही अर्थ नाही, असं म्हणत शेतकऱ्यांनी बुधवारपासून दिल्लीच्या दिशेने कूच करण्याची तयारी केली आहे.

हेही वाचा – Food Poisoning In Buldhana : बुलढाण्यात प्रसादातून 500 जणांना विषबाधा, काहींची प्रकृती चिंताजनक

आंदोलन रोखण्याची सरकारची तयारी

शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी दिल्लीच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. ट्रॅक्टर थांबवण्यासाठी रस्त्यावर खिळे, काटेरी तारांचे कुंपण, सिमेंटचे कठडे टाकले आहेत. तर दुसरीकडे हे कठडे तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी शेकडो जेसीबी आणि पोकलेन मशीन सोबत ठेवल्या आहेत. हजारो संख्येने शेतकरी हरियाणातील शंभू सीमेवर पोहोचले असून पोलिसांनी टाकलेले बॅरिकेड्स तोडून मातीच्या पोत्या टाकून ट्रॅक्टर बाहेर काढण्याची तयारी सुरू आहे. याशिवाय इतर वाहने शेतकऱ्यांनी तयार ठेवली आहेत. शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबत दिल्ली पोलीसही सतर्क आहेत. टिकरी सीमा आणि उत्तर प्रदेशला लागून असलेली गाझीपूर सीमा सील करण्यात आली आहे. संपूर्ण दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. गर्दी जमवण्यास आणि ट्रॅक्टरच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणाच्या डीजीपीने पंजाबच्या डीजीपीला पत्र लिहले आहे. दिल्लीच्या दिशेने येणारे जेसीबी, पोकलेन आणि अन्य जड वाहने दिसतील तिथे जप्त करा, असं डीजीपीने आपल्या पत्रात म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. हरियाणा पोलिसांनी हरियाणा-पंजाबच्या सीमा सील केल्या आहेत. पंजाबला जाण्यासाठी लोकांनी रेल्वेचा वापर करावा, असे पोलिसांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Live Update : नंदुरबारमध्ये भाविकांना प्रसादातून विषबाधा

हरियाणात इंटरनेट बंदी

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंदीचा निर्णय 21 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर पंजाबमधील 7 जिल्ह्यांतील काही भागात केंद्र सरकारने 24 फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट बंद केले आहे. शेतकरी दिल्लीला जाण्यासाठी जमले होते, तिथेच ही बंदी लागू आहे.