(FASTag) नवी दिल्ली : विविध मार्गांवरील टोल आकारणी सुलभ व्हावी, तसेच पैशांवरून होणारे वाद कमी करण्यासाठी तसेच फसवणूक रोखण्यासाठी फास्टॅग (FASTag) प्रणाली सुरू करण्यात आली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने 17 फेब्रुवारीपासून फास्टॅगशी संबंधित नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. पण त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) काही धक्कादायक तक्रारी येत आहेत. वाहन घराच्या समोर पार्क केलेले असतानाही फास्टॅग वॉलेटमधून टोल कापून गेल्याचे उघडकीस आले आहे. कोणताही टोल प्लाझा ओलांडून न जाताही असे मेसेज येत असल्याने वाहनधारक चक्रावून गेले आहेत. तथापि, त्याबाबतचा तपास करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कारवाईला सुरुवातही केली आहे. (Complaints of money being deducted from wallet even when car is parked)
गेल्या काही दिवसांपासून लोकांच्या या संदर्भातील तक्रारी वाढत चालल्या आहेत. याबाबत एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे अनेक कारणांमुळे घडू शकते. कधीकधी कर्मचारी चुकून दुसऱ्या वाहनाचा नंबर टाकतात किंवा कधीकधी लोक त्यांच्या पर्समध्ये फास्टॅग ठेवतात. या परिस्थितीत अशा अडचणींचा सामाना करावा लागू शकतो.
हेही वाचा – Aaditya Thackeray : कोश्यारींची परंपरा सुपारी घेणारे पाळतायेत; महाराजांच्या अपमानप्रकरणी ठाकरे आक्रमक
फास्टॅग वॉलेटमधून बेधडक होत असलेल्या कपातीला आळा घालण्याच्या दृष्टीने एनएचएआयने अशा प्रकरणांमध्ये टोल वसूल करणाऱ्यांवर दंड आकारला आहे. याचे एकदा उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांचा दंड आकारला जात आहे. दंडाची रक्कम एवढी जास्त असल्याने, टोल वसूल करणारेदेखील सावधगिरीने काम करत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कारवाईच्या बडग्यामुळे या प्रकरणांमध्ये 70 टक्के घट दिसून आली आहे. गेल्या एका महिन्यात सुमारे 30 कोटी फास्टॅग व्यवहार झाले आहेत. यापैकी फक्त 50 तक्रारी आमच्याकडे आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी, सोशल मीडियावर अनेकांनी अशा खोट्या फास्टॅग कपातीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याची दखल घेत, एनएचएआयने सोशल मीडियावर एक हेल्पलाइन नंबर (1033) देखील जारी केला होता.
भारतात फास्टॅगची सुरुवात 1 ऑगस्ट 2014मध्ये झाली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर या प्रणालीची सुरुवात करण्यात आली. याची अंमलबजावणी झाल्यानंतर 4 नोव्हेंबर 2014 रोजी दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील काही टोलनाक्यांवर फास्टॅग लागू करण्यात आले. हळूहळू देशभरातील सर्वच टोलनाक्यांवर फास्टॅगची अंमलबजावणी करण्यात येऊ लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने 1 एप्रिल 2025पासून सर्व टोलनाक्यांवर वाहनांना फास्टॅग बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने याआधीच राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर वाहनांसाठी फास्टॅग हे बंधनकारक केले आहे. फास्टॅग नसल्यास वाहनचालकांकडून दुप्पट टोल आकारण्यात येतो. तसेच आता राज्यातही तशीच अंमलबजावणी होणार आहे.
हेही वाचा – Thackeray Vs Mahayuti : आरोग्य खात्यातील घोटाळ्याचे लाभार्थी ‘वर्षा’ बंगल्यावर, ठाकरेंचा निशाणा