घरदेश-विदेशपुन्हा सैराट; जातीबाहेर लग्न केल्यामुळे पित्यानेच केला मुलीचा खून

पुन्हा सैराट; जातीबाहेर लग्न केल्यामुळे पित्यानेच केला मुलीचा खून

Subscribe

मुलीने जातीबाहेर जाऊन लग्न केल्यानंतर माथेफिरू बापाने आपल्या मुलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह जाळून, त्याची राख दूर कर्नाटक सीमेपलीकडे नेऊन टाकली. वर तिनेच आत्महत्या केल्याचा बनाव केला.

आंध्र प्रदेशच्या चित्तोर जिल्ह्यात सैराट चित्रपटासारखी घटना घडली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने जातीबाहेर लग्न केल्यामुळे चिडलेल्या बापाने आपल्याच मुलीचा गळा आवळून खून केला आहे. १२ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली असून पोलिसांनी खूनी बापाला अटक केली असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. आधुनिक भारतात जातीच्या भिंती कितीही नाहीशा करण्याचा प्रयत्न केला तरी जातींमधील विषमता काही केल्या कमी होताना दिसत नाही. नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटातून जातीय विषमता आणि प्रेम यावर भाष्य केले होते. मात्र सैराट सारख्या घटना संबंध देशभर कुठे ना कुठे घडतच आहेत.

शांतीपुरम मंडल येथे राहणारी आर चंदना ही १७ वर्षांची मुलगी १९ वर्षीय नंद कुमारच्या प्रेमात पडली होती. नंदकुमार हा बाजुच्याच गावात राहणारा युवक होता. चंदनाच्या वडिलांना जेव्हा त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल सुगावा लागला तेव्हापासून त्यांनी चंदनाचे घराबाहेर पडणे बंद केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीसाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. तेव्हाच चंदना आणि नंद कुमार यांनी अल्पवयीन असले तरी पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्यांनी ११ ऑक्टोबर रोजी मंदिरात जाऊन लग्न केले.

- Advertisement -

लग्नानंतर चंदनाचे वडील व्यंकटेश यांनी मुलीची समजूत घालून तिचे १८ वयवर्ष पुर्ण होईपर्यंत घरीच राहण्याचा सल्ला दिला. १८ पुर्ण झाल्यानंतर तू सासरी जा, असे त्यांनी सांगितले. चंदनानेही आपल्या वडिलांवर विश्वास ठेवत पुन्हा घरी येण्याचा निर्णय घेतला. १२ ऑक्टोबरला जेव्हा व्यंकटेशची पत्नी अमरावती घरात नव्हती, तेव्हा मुलीबरोबर भांडण काढून वडिलांनीच दोरीने चंदनाचा गळा आवळला. पालमनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकटेशला आपल्या मुलीने गळफास घेतल्याचे भासवायचे होते. त्यासाठी त्याने दोरी छताला बांधून चंदनाचा मृतदेह लटकवला.

खून केल्यानंतर व्यंकटेश आणि त्याचा भाऊ वीरभद्र पेट्रोल पंपवर जाऊन पेट्रोल घेऊन आले. गावाबाहेर चंदनाचा मृतदेह नेऊन तो जाळून टाकला. त्यानंतर मुलीची राख गोण्यामध्ये भरून कर्नाटकाच्या सीमेवर जाऊन टाकून दिली. त्यानंतर मृतदेह जाळलेली जागाही त्यांनी स्वच्छ केली. मात्र ज्या जमिनीवर मृतदेह जाळला होता, त्या जमिन मालकाला संशय आला आणि आठवड्याभरानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

- Advertisement -

पोलिसांनी जेव्हा व्यंकटेश आणि अमरावती यांना चंदनाबाबत प्रश्न विचारला. तेव्हा दोघांनीही पोलिसांना चक्रावून टाकणारे उत्तर दिले. “आमच्या मुलीने आत्महत्या केली होती, आमची समाजात बदनामी होईल. म्हणून आम्ही कुणालाही न सांगता तिचे अंत्यसंस्कार केले” मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच व्यंकटेशने आपला गुन्हा मान्य केला. त्यानंतर पोलिसांनी वडील, आई, काका आणि त्यांच्या पुतण्याला अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -