मुंबई : देशात मोकळा श्वास घेणे कठीण झाले आहे. भयाच्या अदृश्य पोलादी भिंतीत गुदमरल्याची भावना सर्वत्र आहे. जम्मू-कश्मीरमध्ये चार वर्षांपासून निवडणुका नाहीत. मुंबईसह चौदा महानगरपालिकांवर प्रशासक नेमून कारभार चालवणे हा भ्रष्टाचार व लोकशाहीची हत्या आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर आधी ‘ईडी’ लावायची व मग त्यांना पक्षात घेऊन मंत्री करायचे हा स्वातंत्र्याचा अपमान आहे, अशी टीका ठाकरे गटाने भाजपावर केली आहे.
खरे तर आज आपण सगळेच भयानक परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहोत. देशात लोकशाही, व्यक्तिगत स्वातंत्र्य, खाण्यापिण्याचे, कपडालत्ता वापरण्याचे, धार्मिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य धोक्यात आहे. मोदी-शहांच्या सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा अमानुष गैरवापर चालवला आहे व अशा अमानुष गैरवापराचे बळी ठरलेल्या काही उद्योगपतींचे खटले ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे चालवीत आहेत, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
हेच वाचा – ‘हे’च आपल्या देशात लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण, ठाकरे गटाचा हरीश साळवेंवर निशाणा
राहुल गांधी मानहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात हायकोर्टावर केलेले भाष्य हरीश साळवे यांच्या डोळ्यांखालून गेलेच असेल. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द व्हावी, याच एकमेव उद्देशाने संपूर्ण खटला चालवून त्यासाठीच न्यायदान झाले. ही एका संसद सदस्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याची गळचेपी नाही तर काय? संसदेत सत्ताधारी पक्षाचे सभागृह नेते हे बेफामपणे विरोधकांना ‘देशद्रोही’ म्हणतात व त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या खासदारांना संसदेतून बडतर्फ केले जाते, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
मणिपूरच्या हिंसाचारावर नियम 267 नुसार चर्चा व्हावी व पंतप्रधानांनी त्यावर निवेदन करावे, अशी मागणी करणाऱ्या संजय सिंह, डेरेक ओब्रायन या राज्यसभा सदस्यांवर कठोर कारवाई केली. दिल्लीतील लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्यांचे अधिकार काढून घेतले व त्यांना पंगू केले. मणिपुरात हिंदुस्थानी नागरिक असलेल्या महिलांची नग्न धिंड काढूनही तेथील भाजपा मुख्यमंत्र्यांना संपूर्ण अभय आहे. ही मनमानी असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
हेही वाचा – आता पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार 730 दिवसांची Child Care Leave
हरीश साळवे हे ‘साम्राज्या’चे वकील आहेत. आपल्या देशातील अनेक कॉर्पोरेट्स, बड्या उद्योगपतींचे ते कायदेशीर सल्लागार आहेत. त्यांना त्यांची मते मांडण्याचा संपूर्ण अधिकार आहे, पण त्यांची मते व देशातील सद्यस्थिती यात मोठे अंतर आहे. आपण आपली लोकशाही, संसदीय परंपरा हे इंग्लंडकडून घेतल्याचे म्हटले जाते. इंग्लंडमध्ये लोकशाही, वैयक्तिक स्वातंत्र्य शाबूत आहे, तेथे सर्व धर्मांत समन्वय आहे म्हणून ऋषी सुनक पंतप्रधान होऊ शकले. आपल्या देशात धर्म, धर्मांधता, जातीयवादास खतपाणी घालून राजकारण केले जाते हे ठीक, पण आता राजकीय स्वार्थासाठी धर्माधर्मांत भांडणे लावून दंगलीचे वणवे पेटवले जातात. लोकशाहीवरचे हे आक्रमण धोकादायक आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.