प्रणव मुखर्जी अनंतात विलीन, दिल्लीत झाले अंत्यसंस्कार

pranab mukherjee
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर

भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित प्रणव मुखर्जी यांच्यावर आज दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार झाले. त्याआधी दिल्लीतील त्यांचं निवासस्थान असलेल्या १० राजाजी मार्ग या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोजक्या लोकांची अंत्यदर्शनासाठी उपस्थिती होती. आज सकाळीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. गेल्या काही दिवसांपासून प्रणव मुखर्जींना प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. १० ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीच्या सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, अखेर सोमवार ३१ ऑगस्ट रोजी वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच अनेक मान्यवरांनी आज प्रणव मुखर्जी यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

यामध्ये उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत, लष्कर प्रमुख जनरल एम. एस. नरवणे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया, नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंह यांचा समावेश होता. त्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, भाकपा नेते डी. राजा, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देखील प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली.