द्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्याबाबत भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्रमुक पक्षाकडून तक्रारीत म्हटले आहे की, अमित मालवीय यांनी उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत जे वक्तव्य केलं होतं, त्याचा विपर्यास करून पोस्ट केलं आहे. ( FIR filed against BJP leader Amit Malviya The statement made by Udayanidhi Stalin regarding Sanatan Dharma )
या तक्रारीवरून तामिळनाडूच्या त्रिची पोलिसांनी बुधवारी (६ सप्टेंबर) अमित मालवीय यांच्याविरुद्ध कलम १५३ अ, ५०४,५०५ १ (बी) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी नुकतीच सनातन धर्माची तुलना कोरोना, डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती आणि ते नष्ट करण्याचं वक्तव्य केलं होतं.
अमित मालवीय यांची पोस्ट काय?
अमित मालवीय यांनी उदयनिधी स्टॅलिन यांचा एक्स हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यांनी त्याखाली लिहिलंय की, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि द्रमुक सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचा संबंध मलेरिया आणि डेंग्यूशी जोडला आहे. केवळ विरोध न करता सनातन धर्म हा नष्ट केला पाहिजे, असंही त्यांचं मत आहे.”
तसंच, अमित मालवीय यांनी पुढे लिहिले की, “थोडक्यात, ते सनातन धर्माचे पालन करणार्या भारतातील 80 टक्के लोकसंख्येच्या नरसंहार करण्याच आव्हान देत आहेत. द्रमुक हा विरोधी पक्ष भारताचा प्रमुख सदस्य आणि काँग्रेसचा दीर्घकाळचा सहयोगी आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले, असं मालवीय यांनी लिहिलं. त्यांच्या याच विधानानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा: शिवसेनेची ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हीच भूमिका आहे आणि राहणार, ठाकरे गटाने ठणकावले )
उदयनिधींचं वाढत्या वादावर स्पष्टीकरण
सनातन धर्मावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले होते, मी कधीही सनातन धर्म मानणाऱ्या लोकांचा नरसंहार करावा, असं आव्हान केलेलं नाही. मी फक्त सनातन धर्मावर टीका केली आहे आणि सनातन धर्म नष्ट झाला पाहिजे, असे मी वारंवार म्हटलं आहे. भाजपचे काम खोट्या बातम्या पसरवणे आहे आणि ते माझया वक्तव्याचा विपर्यास करत आहेत.