जमशेदपूरच्या टाटा स्टील प्लांटमध्ये अग्नितांडव; दोन जण जखमी

fire breaks out at tata steel company coke plant jharkhand cm hemant soren
जमशेदपूरच्या टाटा स्टील प्लांटमध्ये अग्नितांडव; दोन जण जखमी

झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टीलच्या कोक प्लांटमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आज सकाळी 10.20 वाजता टाटाच्या MMM कोक प्लांटच्या बॅटरी क्रमांक 6 आणि 7 मध्ये ही घटना घडली. या घटनेत आत्तापर्यंत दोन कर्मचारी जखमी झाल्य़ाची माहिती समोर आली आहे. दरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही या घटनेवर ट्विट केले आहे.

हा स्फोट इतका भीषण होता की, आरएमएम, सिंटर प्लांट वन आणि टूमध्ये चेंगराचेंगरी झाली. सर्व कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत बाहेर काढण्यात आले तेथून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. दुसरीकडे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. सध्या कर्मचार्‍यांना प्लांटबाहेर काढण्यात आले असून आजूबाजूचा परिसर रिकामा करून तेथील गॅस गळती थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच प्लांटच्या बॅटरी क्रमांक 5, 6, 7 मधील दोषाचा परिणाम बॅटरी क्रमांक 8 आणि 9 मध्ये देखील दर्शविला गेला आहे. सध्या प्लांट पुन्हा सुरू करण्याची कसरत सुरु आहे.

कॉर्पोरेट कम्युनिकेशनने सांगितले की, स्फोटामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सने जारी केलेल्या निवेदनानुसार, जमशेदपूर येथील कोक प्लांटच्या बॅटरी 6 मध्ये आज सकाळी 10:20 वाजताच्या सुमारास गॅस लाइनमध्ये स्फोट झाला. सध्या बॅटरी 6 काम करत नव्हती त्यामुळे ती हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे, लेस आणि फायर ब्रिगेड तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे, परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी टीएमएचमध्ये पाठवण्यात आले आहे.