घरदेश-विदेशदिल्लीत रबर कारखान्याच्या गोदामाला भीषण आग

दिल्लीत रबर कारखान्याच्या गोदामाला भीषण आग

Subscribe

१८ तासानंतरही आगीवर नियंत्रण नाही

दिल्लीतील मालवीयनगरमधील एका रबर कारखान्याच्या गोदामाला मंगळवारी संध्याकाळी भीषण आग लागली. गेल्या १८ तासांपासून सुरु असलेल्या या आगीवर अद्यापही नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. या आगीने रौद्ररुप धारण केले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या ८० गाड्या दाखल झाल्या आहेत. वायूसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

परिसरातील नागरिकांनी संपूर्ण रात्र घराबाहेर काढली

दिल्लीच्या शाम निरंकारी स्कूलजवळ असणाऱ्या रबर कारखान्याच्या गोदामाला मंगळवारी संध्याकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरातील १३ इमारती खाली करण्यात आल्या. आसपास राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी घराच्या बाहेर पडत पूर्ण रात्र घराबाहेर काढली. गेल्या १८ तासापासून ही आग सुरु आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. कृत्रिम पाऊस पाडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -

बेकायदेशीर गोदामांमुळे आग नागरिकांचा आरोप

परवानगी नसताना देखील या परिसरात बेकायदेशीर रबर आणि केमिकल गोदामे आहेत. बेकायदेशीर गोदामांवर पोलीस कारवाई का करत नाही? असा सवाल स्थानिक नागरिकांनी केलाय. आग लागलेल्या कारखान्यामध्ये केमिकल आणि रबरचे ड्रम ठेवण्यात आले होते. आग जास्त पसरु नये, यासाठी रात्रीच केमिकल आणि रबरचे ड्रम बाहेर काढण्यात आले.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

या आगीमध्ये अद्याप कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र आगीत गोदाम पूर्णत: जळून खाक झाले आहे. या रबर कारखान्यात रबरचे सीट घेऊन एक ट्रक आला होता. मंगळवारी संध्याकाळी अचानक या ट्रकला आग लागली. काही क्षणातच ही आग संपूर्ण गोदामाला लागली. ट्रकला नेमकी आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग नियंत्रणात आली असली तरी पूर्णपणे आग विझवण्यासाठी बराच वेळ लागेल, अशी माहिती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. याप्रकरणी साकेत पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -