देशात केरळमध्ये सापडला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण

केरळमधील कोल्लम येथे देशातील पहीला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला असून जनतेने घाबरून जाऊ नये असे आवाहन आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी केले आहे.

केरळमधील कोल्लम येथे देशातील पहीला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला असून जनतेने घाबरून जाऊ नये असे आवाहन आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी केले आहे. येथील टीव्हीएम मेडीकल कॉलेजमध्ये एका रुग्णाच्या नमुन्याची चाचणी करण्यात आली. तेव्हा त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. रुग्णाच्या आई वडिलांना तिरुवनंतपुरम मेडीकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे त्यांच्या योग्य त्या चाचण्या करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत.

 

वीना जॉर्ज यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार युएईमधून आलेल्या एका तरुणामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळल्याने त्याला केरळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला ताप आला असून त्याच्या शरीरावर लालसर चट्टे देखील पडले आहेत. त्यानंतर त्याच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्यासाठी त्याचे काही नमुने नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी येथे पाठवण्यात आले होते. त्यात त्याला मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. युएईमध्ये असताना हा तरुण एका मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे त्याने सांगितले. त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

२७ देशांमध्ये ८०० हून अधिक केसेस

जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने दिलेल्या माहितीनुसार जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाबरोबरच अनेक गंभीर आजारांचा संसर्ग वाढत आहे. आजच्या घडीला जगातील २७ देशांमध्ये मंकीपॉक्सचे ८०० रुग्ण आहेत. विशेष म्हणजे मंकीपॉक्सने आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.