ईशान्येतील नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय येथील निवडणुकांच्या निकालांचे चित्र जवळजवळ निश्चित झाले आहे. पण नागालँडमध्ये एक इतिहास रचला गेला आहे. या राज्यातून प्रथमच एक महिला उमेदवार विजयी झाली असून हेकानी जाखलू असे या विजयी झालेल्या महिला उमेदवाराचे नाव आहे.
नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये एक ऐतिहासिक निकाल लागला आहे. या राज्यातील एका विधानसभा मतदारसंघामधून पहिल्यांदाच एक महिला उमेदवार विजयी झाली आहे. तब्बल 60 वर्षानंतर एक महिला उमेदवार विजयी झाल्याने हा ऐतिहासिक निकाल लागला असल्याचे बोलले जात आहे. त्रिपुरामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी म्हणजेच NDPP यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. याच पक्षाकडून हेकानी जाखलू यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांनी या निवडणुकीत विजय मिळविला आहे.
व्यवसायाने वकील असलेल्या हेकानी जाखलू यांनी दिमापूर-III या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी याठिकाणाहून 1 हजार 536 मतांनी विजय मिळविला आहे. लोकजनशक्तीचे उमदेवार एजेतो झिमोमी यांचा हेकानी यांनी पराभव केला.
नागालँड येथे आतापर्यंत 14 वेळा विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. पण याआधी कधीही कोणतीही महिला विजयी झालेली नाही. यंदाच्या निवडणुकांमध्ये हेकानी जखालू यांच्यासोबत NDPP च्या सलहौतुओनुओ क्रूस, काँग्रेसच्या रोजी थॉम्पसन आणि भाजपच्या काहुल सेमाही या महिला सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. परंतु, हेकानी यांनी विजयी होऊन नागालँडमध्ये पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान मिळविला आहे.
दरम्यान, नागालँडमध्ये भाजपा-एनडीपीपी युती पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. भाजपा-एनडीपीपीचे उमेदवार एकूण 35 जागांवर आघाडीवर आहेत. नागालँडमध्ये भाजपा आणि नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी (NDPP) यांची युती असून सर्व 60 जागा त्यांनी लढवल्या आहेत. जागावाटपानुसार भाजपाने 60 पैकी 20 जागांवर तर उर्वरित 40 जागांवर एनडीपीपीने निवडणूक लढली आहे.
हेही वाचा – कसब्यात मविआचा विजय, संजय राऊतांची भाजपावर टीका
नागालँडमध्ये एकूण 13 लाख 17 हजार 632 मतदार असून त्यापैकी महिला मतदारांची संख्या 6 लाख 56 हजार 143 इतकी आहे. एकूण मतदारांच्या हे प्रमाण 49.8 टक्के आहे. नागालँडमध्ये पहिल्यांदा 1977 मध्ये रानो मेस्से शाझिया लोकसभेवर निवडून आल्या होत्या. त्या युनायटेड डेमोक्रॅटिक पक्षाच्या होत्या. भाजपने गेल्या वर्षी एस फांगनॉन कोन्याक या आणखी एका महिलेला राज्यसभेवर पाठवले आहे.