घरदेश-विदेशराऊत प्रभारी असलेल्या गोव्यात सेनेच्या ११ उमेदवारांना १६८७ मते

राऊत प्रभारी असलेल्या गोव्यात सेनेच्या ११ उमेदवारांना १६८७ मते

Subscribe

शिवसेनेने उत्तर प्रदेश विधानसभा 2022 च्या निवडणुकीच्या मैदानात भाजपला आव्हान देत शिवसेनाही उतरली. या निवडणुकीत शिवसेनेनं राज्यात तब्बल 60 जागांवर आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली होती. मात्र, त्यातील 19 उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं केवळ 41 जणांना प्रत्यक्ष निवडणूक लढवण्याची संधी मिळाली होती.

– वैभव देसाई
शिवसेना प्रादेशिक पक्ष असूनही पक्षप्रमुखांना फाजिल आत्मविश्वास दाखवत गोवा, उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये निवडणूक लढवण्यास कारणीभूत ठरलेले खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत आणि खासदार राहुल शेवाळे हे चौघेही नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक निकालाने तोंडघशी पडले आहेत. गोव्याचे प्रभारी असलेल्या संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेनेने ११ जागा लढविल्या खर्‍या मात्र नोटापेक्षाही कमी मते मिळाली. ११ उमेदवारांना केवळ १६८७ मते मिळालीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणाने प्रचाराला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि युवासेना आयत्या वेळी प्रचारात उतरली, मात्र अपुर्‍या नियोजनामुळे गोव्यात, उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये हसे झाले, अशी चर्चा आता शिवसेनेतच सुरू झाली आहे.

पाच राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये चार राज्यांत भाजप सरकार स्थापन करणार आहे, तर एका राज्यात आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे. या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये उतरलेल्या शिवसेनेचा गोवा, उत्तर प्रदेश आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. तिन्ही राज्यांत शिवसेनेला एकही जागा मिळवता आली नाही. धक्कादायक म्हणजे शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत.

- Advertisement -

दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल आणि हिंदुत्वाचा जोर असणार्‍या राज्यांमध्ये शिवसेनेने यापूर्वीही निवडणुका लढवल्या होत्या. तसेच गोवा, बेळगावमध्ये उमेदवार दिले होते, पण इतके अपयश शिवसेनेला कधीच आले नाही. शिवसेनेने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासहअनेक बड्या नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. आदित्य ठाकरे यांनी गोवा, उत्तर प्रदेशात जोरदार प्रचार केला. त्यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, खासदार राजन विचारे आणि अरविंद सावंत हेदेखील सहभागी झाले होते.

खासदार अरविंद सावंत यांनीही उत्तर प्रदेशमध्ये, तर खासदार राहुल शेवाळे यांनी मणिपूरमधील उमेदवारांसाठी प्रचार केला होता. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही त्यांच्यासोबत होत्या. खासदार संजय राऊत यांनी गोव्यात अनेक सभा घेतल्या होत्या. तरीसुद्धा महाराष्ट्राला लागून असलेल्या गोव्यात शिवसेनेच्या पदरी निराशाच पडली. मराठी भाषिक लोकांची संख्या असलेल्या ठिकाणीही शिवसेनेला यश मिळाले नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूरमध्ये शिवसेनेला जनाधार नसल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेशच्या मैदानात भाजपला आव्हान देत शिवसेना उतरली. येथे शिवसेनेने ६० जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली होती, मात्र त्यातील १९ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने केवळ ४१ जणांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. मणिपूरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या शिवसेनेने घोषणापत्र जाहीर केले होते. येथील ६० जागांपैकी शिवसेनेने ९ जागा लढवल्या होत्या, पण येथेही त्यांच्या पदरात यश पडले नाही. गोव्यात शिवसेनेच्या सर्व ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. गोव्यातील चार जागांवर तर शिवसेनेला १०० पेक्षा कमी मते मिळाली. गोव्यातील हळदोणा मतदारसंघातून शिवसेनेच्या गोविंद गोवेकरांना ३४२ मते मिळाली, तर कुडतरी मतदारसंघातून भक्ती खडपकर यांना अवघी ५५ मते, मांद्रे मतदारसंघातून बबली नाईक यांना ११६ मते, म्हापसामध्ये जितेश कामत यांना १२३ मते, पेडणेतून सुभाष केरकर यांना २२३ मते, पर्ये मतदारसंघातून गुरुदास गावकर यांना २६७ मते, केपेमध्ये अ‍ॅलेक्सी फर्नांडिस यांना ६६ मते, साखळी मतदारसंघातून सागर धारगळकर यांना ९७ मते, शिवोली मतदारसंघातून करिश्मा फर्नांडिस यांना १६६ मते, वाळपईतून देविदास गावकर यांना १८३ मते, वास्कोमधून मारुती शिरगावकर यांना ४९ मते मिळाली. गोव्यात सेनेच्या ११ उमेदवारांना मिळून एकूण १६८७ मते मिळाली आहेत.

गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून सात वेळा खासदार राहिलेल्या मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या शिवसेनेकडून खासदार झाल्या. कलाबेन डेलकर यांच्या विरोधात भाजपचे महेश गावित होते. गावित यांचा त्यांनी ५१,२६९ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार्‍या शिवसेनेने पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर लोकसभेची जागा जिंकली होती. त्यामुळेच पाच राज्यांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

नोटा आणि शिवसेनेची मते

गोव्यात नोटाला १.१२ टक्के मते मिळाली, तर शिवसेनेला केवळ ०.१८ टक्के मते मिळाली. मणिपूरमध्ये नोटाला ०.५४ टक्के आणि शिवसेनेला ०.३४ टक्के मते मिळाली. उत्तर प्रदेशात शिवसेनेला ०.०३ टक्के आणि नोटाला ०.६९ टक्के मते मिळाली.

सेनेचे अपयश भाजपच्या पथ्यावर?

या निवडणुकीत शिवसेनेला आलेले अपयश हे भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तांतर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात खुबीने रंगवली जात आहे, तर दुसरीकडे भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा खरी लढाई मुंबईत होणार असल्याचं सांगत शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत शिवसेना पुन्हा सत्तेत परतणार आहे की जाणार हे येत्या काही दिवसांत समजेल.

मतदारसंघनिहाय उमेदवारांना मिळालेली मते

हळदोणा – गोविंद गोवेकर – 342
कुडतरी – भक्ती खडपकर – 55
मांद्रे – बबली नाईक – 116
म्हापसा – जितेश कामत – 123
पेडणे – सुभाष केरकर – 223
पर्ये – गुरुदास गावकर – 267
केपे – अ‍ॅलेक्सी फर्नांडिस – 66
साखळी – सागर धारगळकर – 97
शिवोली – करिष्मा फर्नांडिस -166
वाळपई – देविदास गावकर – 183
वास्को – मारुती शिरगावकर – 49

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -