Flood in Tripura: त्रिपुरामध्ये अतिवृष्टीनंतर पुराचा कहर, 10 हजारांहून अधिक लोक बेघर

जवळपास आठ तास पाऊस न झाल्याने हावडा नदीची पाणीपातळी धोक्याच्या इशाऱ्याहून खाली आली आहे. येत्या २४ तासांत हवामान खात्याने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने रविवारी परिस्थिती आणखी सुधारेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

आगरतळा: त्रिपुरामध्ये शुक्रवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे राज्यात 10 हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिलीय. पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील सदर उपविभागात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे दोन हजारांहून अधिक लोक बेघर झालेत.

पुराचा परिणाम पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील आगरतळा आणि त्याच्या शेजारील भागात मर्यादित आहे, जिथे हावडा नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे आणि आगरतळा महापालिका आणि त्याच्या लगतचे भाग पाण्याखाली गेले आहेत. मात्र, पुरामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (SDMA) वरिष्ठ अधिकारी सरत कुमार दास यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 155 मिमी पाऊस पडला असून, हावडा नदीकाठी अनेक सखल भागात पाणी शिरले आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा

शरत कुमार दास म्हणाले, “बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पुरामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यास सांगितले, जेणेकरुन बाधित लोकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळू शकेल.” ते म्हणाले की, आगरतळा आणि इतर उपविभागांमध्ये पुरामुळे 10,000 हून अधिक सदस्य एकूण 2057 कुटुंबांनी 39 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. आगरतळा येथे 1921 पूरग्रस्तांनी 34 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील जिरानिया येथे तीन छावण्या उभारण्यात आल्या आहेत.

जवळपास आठ तास पाऊस न झाल्याने हावडा नदीची पाणीपातळी धोक्याच्या इशाऱ्याहून खाली आली आहे. येत्या २४ तासांत हवामान खात्याने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने रविवारी परिस्थिती आणखी सुधारेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

आसाममध्ये पुरामुळे हाहाकार

आसाममध्ये पुरामुळे तारांबळ उडाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) एक प्रसिद्धी जारी करून माहिती दिली आहे की, गेल्या 24 तासांत पूर आणि भूस्खलनामुळे आणखी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा 62 वर पोहोचला आहे. आठ लोकांपैकी करीमगंज जिल्ह्यात 2 जण आणि हैलाकांडी जिल्ह्यात 1 जण भूस्खलनामुळे जिवंत गाडला गेला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी पुराच्या पाण्यात बुडून सहा जणांना जीव गमवावा लागला. राज्यातील 32 जिल्ह्यांतील 4,291 गावांमध्ये 30 लाखांहून अधिक बाधित झाले आहेत.


हेही वाचाः अग्निपथ योजनेवरून उत्तर प्रदेशात हिंसाचार; 500 अज्ञातांविरोधात FIR दाखल; मालमत्ता होणार जप्त