Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश श्रीलंकेत फूड इमर्जन्सी, अन्नासाठी दुकानांबाहेर रांगा

श्रीलंकेत फूड इमर्जन्सी, अन्नासाठी दुकानांबाहेर रांगा

खासगी बँकांकडे आयातीसाठी परकीय चलनाचा अभाव असल्याने अध्यक्षांनी घेतला निर्णय

Related Story

- Advertisement -

खासगी बँकांकडे आयातीसाठी परकीय चलनाचा अभाव असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत अन्नधान्यविषयक आणीबाणीची जाहीर करण्यात आलीय. श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी दोन दिवसांपूर्वी तांदूळ व साखरेसह अन्य जीवनावश्यक अन्नधान्याची साठेबाजी रोखण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीची घोषणा केली. मंगळवारी मध्यरात्रीपासून श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आलीय.

दैनंदिन गरजेच्या साखर, तांदूळ, कांदे, बटाटे अशा जीवनावश्यक अन्नधान्याच्या किमती झपाट्याने वाढल्याने ही आणीबाणी जाहीर करण्यात आली. श्रीलंकेमध्ये दूध पावडर, रॉकेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, दुकानांबाहेर नागरिकांच्या लांबवर रांगा लागल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी तांदूळ, साखर इ. जीवनावश्यक अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सैन्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची आवश्यक सेवा आयुक्ताच्या रूपाने नियुक्ती केलीय.

- Advertisement -

सरकारने अन्नधान्याचा साठा करणाऱ्यांच्या दंडात वाढ केलीय. कोरोना संसर्गाचं संकट कायम असतानाच आता २१ दशलक्ष लोकसंख्या असलेला श्रीलंका आता दुसऱ्या संकटात सापडलाय. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेच्या चलनात ७.५ टक्के घट झालीय. या पार्श्वभूमीवर ‘सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका’ने काही दिवसांपूर्वीच व्याजदरांमध्ये वाढ केली होती. कोरोनामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी झालीय. त्यात श्रीलंकेसारख्या लहान आणि विकसनशील देशांना दुहेरी संकटांना तोंड देणं कठीण झालंय.

श्रीलंकेच्या परकीय चलनात घट होऊन जुलैअखेरीस ती २.८ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली. नव्या सरकारनं सूत्रं हाती घेतल्यानंतर २०१९ मध्ये हा आकडा ७.५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. मात्र, त्या तुलनेत आता राहिलेले चलन कमी झाले आहे.

- Advertisement -