सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आता लाईव्ह वाचा, सरन्यायाधीशांकडून नवी प्रणाली लॉन्च

नवी दिल्ली – कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) द्वारे चालविलेले तंत्रज्ञान वापरून सर्वोच्च न्यायालयाने आज पहिल्यांदा सुनावणीचे थेट ट्रान्सक्रिप्शन स्ट्रिमिंग केले. म्हणजेच, कोर्टात सुरू असलेला युक्तीवाद आणि त्यावर न्यायाधीशांनी नोंदवलेल्या सूचना लिखित स्वरुपातही उपलब्ध होत होत्या. आज मुख्य न्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी प्रायोगिक लाइव्ह ट्रान्सक्रिप्शन लॉन्च केले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुरू असलेल्या सुनावणीवेळी याचा वापर करण्यात आला.

ही प्रणाली कसे काम करते याचं आम्ही निरिक्षण करू. खासकरून घटनापीठाकडे सुरू असलेल्या सुनावणीचे कायमस्वरुपी रेकॉर्ड ठेवता येणार आहे, असं चंद्रचूड म्हणाले. याचा फायदा विधि महाविद्यालयात कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही होणार आहे, असंही ते म्हणाले.

खंडपीठाच्या अहवालानुसार, “न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रतिलेखन दाखवणारी स्क्रीन कोर्टरूम 1 मध्ये वकिलांच्या समोर ठेवली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालय आपल्या वेबसाइटवर तोंडी युक्तिवादांचे उतारे उपलब्ध करून देईल. ट्रान्सक्रिप्शन सेवा TERES द्वारे केली जात आहे, ही कंपनी मध्यस्थी प्रॅक्टिशनर्सना सुविधा पुरवत आहे.”

ऐकू कमी येणाऱ्या व्यक्तींसाठी ही प्रणाली फायदेशीर ठरणार आहे. कारण, सुनावणीदरम्यान कोर्टात काय सुरू आहे हे अनेकदा श्रवण क्षमता कमी असणाऱ्यांना समजत नाही. त्यामुळे सुनावणीचे प्रतिलेखन उपलब्ध झाल्यास याचा फायदा ऐकू कमी येणाऱ्यांना होऊ शकतो.

कोर्टातील सुनावणी लाईव्ह स्ट्रिमिंग व्हावी किंवा त्याचं प्रतिलेखन व्हावं अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. काही सामाजिक विषयांवर सुरू असलेल्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष असतं. कोर्टाचे काही निर्णय देशपातळीवर निर्णायक ठरतात. त्यामुळे अशा सुनावणीचं लाईव्ह स्ट्रिमिंग व्हावी अशी मागणी करण्यात येत होती. यामागणीवर आता गांभीर्याने विचार सुरू झाला असून प्रायोगिक तत्वावर ट्रान्स्क्रिप्शन स्ट्रिमिंगला सुरुवात झाली आहे.