मुंबई : विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे आहेत. मात्र, भाजपकडे कोण आहे? असा विचारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. तर याला उत्तर देताना महाराष्ट्र भाजपाने उद्धव ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत, विसरभोळे की सरडा? असा खोचक सवाल केला आहे.
रंग बदलण्याचा गुणधर्म सरड्या नंतर माणसात आला त्यात उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आला.#Ghamandiya pic.twitter.com/OKtqd35Cma
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 31, 2023
आता 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात हुकूमशाही येत असल्याचा आरोप करत विरोधकांनी एकजूट दाखविली आहे. 23 जून 2023 रोजी विरोधकांची पहिली बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली. त्या बैठकीला 15 विरोध पक्ष उपस्थित होते. त्यानंतर दुसरी बैठक 18 जुलै 2023 रोजी बंगळुरूमध्ये झाली. या बैठकीत 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे ‘इंडिया’ असे नामकरण करण्यात आले. आता ‘इंडिया’ नामक विरोधकांच्या आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना, विरोधकांच्या आघाडीकडून पंतप्रधानरपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, आमच्याकडे (इंडिया आघाडी) पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे आहेत. मात्र, भाजपाकडे मोदींशिवाय दुसरा कुठला पर्याय आहे का? असा प्रतिप्रश्न केला.
हेही वाचा – ‘इंडिया’चा लेखाजोखा मागणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंनी सुनावले खडेबोले
यावरून महाराष्ट्र भाजपाने ट्वीट करत त्याला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने शेअर केलेल्या एका जुन्या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे सांगतात, ‘आमच्याकडे चेहरा आहे, लीडर आहे. काँग्रेसकडे तर चेहराच नाही. याचा अर्थ, काँग्रेसला मत देणे म्हणजे अंधारात उडी मारण्यासारखे आहे. कौन बनेगा प्रधानमंत्री? माहीत नाही. कौँग्रेसचा बनणे असंभव आहे. मग मुलायमसिंह बनणार, लालूप्रसाद यादव बनणार?’ विसरभोळे की रंगबदलू सरडा? या नावाने असलेल्या व्हिडीओला ‘रंग बदलण्याचा गुणधर्म सरड्यानंतर माणसात आला, त्यात उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आला,’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.