द्रौपदी मुर्मूंची वाटचाल विजयाकडे; खासदारांसह १० राज्यांच्या आमदारांकडूनही पसंती

Draupadi Murmu

नवी दिल्ली : देशाचे नवे राष्ट्रपती कोण हे आज स्पष्ट होईल. सोमवारी (१८ जुलै) मतदानाच्या दिवशीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. आजच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत बहुतांश खासदारांनी मुर्मू यांना पसंती दिली आहे. एकूण दोन फेऱ्यांमधील ६,७३,१७५ मूल्यांची १८८६ वैध मतांची मोजणी झाली, त्यात द्रौपदी मुर्मू यांना ४,८३,२९९ मूल्यांसह १३४९ मते आणि यशवंत सिन्हा यांना १,८९,८७६ मूल्यांसह ५३७ मते मिळाली आहे.

देशभरातील सुमारे ४८०० आमदार आणि खासदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले. प्रत्यक्ष मतदानाची तारीख येईपर्यंत विरोधकांमध्येच फूट पडल्याने द्रौपदी मुर्मू यांचा विजय सुकर झाला होता. विशेष म्हणजे, विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. पण नंतर यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणाऱ्या बिजद, वायएसआर काँग्रेस, अकाली दल, जदएस, झामुमो, शिवसेना और टीडीपी यासारख्या पक्षांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे यशवंत सिन्हा यांना केवळ काँग्रेस, डावे, आप, टीएमसी, एसपी, राजद, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, रालोद, टीआरएस, नेशनल कॉन्फरन्स, केरळ काँग्रेस एम यांचे समर्थन आहे. याशिवाय, अनेक राज्यांत द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने क्रॉस व्होटिंग देखील झाले. त्यामुळे निकालाची केवळ औपचारिकता उरली आहे.

हेही वाचा – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा! गणेश मूर्तींवरील उंचीची मर्यादा हटवली

पहिल्या फेरीत खासदारांच्या मतांची मोजणी झाली. एकूण वैध मतांपैकी ३,७८,००० मूल्यांसह ५४० मते द्रौपदी मुर्मू यांना तर, १,४५,६०० मूल्यांसह २०८ मते विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मिळाली. १५ मते अवैध ठरली, अशी माहिती राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांनी दिली. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलैला पूर्ण होत असून २५ जुलैला नवे राष्ट्रपती पदग्रहण करतील. या निवडणुकीत मुर्मू यांचा विजयी झाल्यास राष्ट्रपतीपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरतील.

हेही वाचाअविवाहित महिलेला २४ आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल