मुंढेंची वारंवार बदली दुर्दैवी -अण्णा हजारे

Anna Hazare
अण्णा हजारे

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या झालेल्या बदलीबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चांगल्या अधिकार्‍यांच्या वारंवार बदल्या केल्यामुळे समाज, शहर आणि राज्याचे नुकसान होत असते, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.अशा अधिकार्‍यांनी बदलीला न घाबरता काम करावे. तसेच सर्वच अधिकार्‍यांनी नियमात राहून कोणालाही न घाबरता काम करण्याची तयारी ठेवली तर जे ७२ वर्षांत होऊ शकले नाही ते केवळ १० वर्षांत होऊ शकेल, असा विश्वास हजारे यांनी व्यक्त केला. चांगले काम करत असताना असे अधिकारी समाज आणि देश याचा विचार करतात. मात्र, काही लोकांना हेच आवडत नाही म्हणून चांगल्या अधिकार्‍यांच्या वारंवार बदल्या होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपण याचसाठी २००३ साली आझाद मैदानावर आंदोलन करुन बदल्यांचा कायदा सरकारकडून संमत करुन घेतला होता. त्यामुळे ३ वर्षे पूर्ण होण्याअगोदर बदली होणे चुकीचे असल्याचे मत अण्णांनी व्यक्त केले.
वारंवार बदल्या झाल्याने अधिकार्‍यांची चांगले काम करण्याबाबत उदासीनता निर्माण होते, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न अण्णांनी उपस्थित केला. यामुळे समाज, शहर आणि राज्यावर परिणाम होऊ शकतो असेही ते म्हणाले. तुकाराम मुंढे यांची दबावातून झालेली बदली दुर्दैवी बाब असून त्याचे वाईट वाटल्याचे अण्णांनी नमूद केले आहे.