Covid-19 : लस घ्या- वॉशिंग मशीन, मिक्सर मिळवा

From Washing Machines to Mixer Grinders, Karur District to Give Away Gifts to People Getting Vaccinated
लस घ्या- वॉशिंग मशीन, मिक्सर मिळवा

कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी आरोग्याच्या दृष्टीने लसीकरण गरजेचे आहे. मात्र अनेक नागरिक आजही भीती पोटी किंवा निष्काळजीपणाने लसीकरणाकडे पाठ फिरवताना दिसतायत. अशा नागरिकांसाठी तामिळनाडूमध्ये एक नामी शक्कल लढवण्यात आली आहे. तमिळनाडूच्या करुर जिल्ह्यात अशा नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन देण्य़ासाठी अनेक महगड्या वस्तूंचे गिफ्ट देण्याची योजना आखण्यात आली आहे. याठिकाणी कोरोनाविरोधी लसीचा डोस घेणाऱ्या नागरिकांना वॉशिंग मशीन आणि मिक्सर यांसारख्या वस्तू बंपर गिफ्टस् म्हणून देण्यात येणार आहेत.

जगभरात कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. काही राज्यांमध्ये लसीकरणाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याचे पाहायला मिळते. मात्र लसीकरणाच सर्वाधिक नागरिकांनी सहभावी व्हावे यासाठी आरोग्य प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या करुर जिल्हा प्रशासनानेही लस घ्या अन् वॉशिंग मशीन आणि मिक्सरसारखे बंपर गिफ्ट्स मिळवा, अशी ऑफर दिली आहे. यासाठी करुर जिल्हा प्रशासनाने येत्या रविवारी मेगा लसीकरण मोहिम राबवणार आहे. या मेगा लसीकरण मोहिमेत लस घेणाऱ्या नागरिकांना वॉशिंग मशीन, मिक्सर, प्रेशर कुकर किंवा इतर महागड्या वस्तू, भांडी बक्षीस म्हणून जिंकण्याची संधी मिळणार आहे.


१८ वर्षांवरील नागरिकांसाठी राज्यात राबवली जाणारी ही दुसरी मेगा लसीकरण मोहिम आहे. विशेष बाब म्हणजे येत्या रविवारी या मेगा लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर लकी ड्रॉ काढला जाणार आहे. यात या घरगुती वस्तू बक्षीस म्हणून दिल्या जातील. यासंदर्भात करुरचे जिल्हाधिकारी टी. प्रभू शंकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत माहिती जाहीर केली.

या लकी ड्रॉमधील पहिले मोठे बक्षीस वॉशिंग मशीन आहे. तर दुसरे बक्षीस वेट ग्राइंडर आणि तिसरे मिक्सर ग्राइंडर ठेवले आहे. यात प्रेशर कूकरसह आणखी २४ मोठ्या बक्षीसांचाही समावेश आहे. याशिवाय आणखी १०० वस्तू उत्तेजनार्थ बक्षिसे म्हणून देण्यात येणार आहेत असही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत २५ पेक्षा जास्त लोकांना लसीकरण मोहिमत आणणाऱ्या स्वयंसेवकालाही लकी ड्रॉमध्ये सहभागी करुन घेतले जाणार आहे. करूर जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे राज्याचे आरोग्य मंत्री मा सुब्रमण्यम यांनी देखील कौतुक केले आहे. त्यामुळे आता नागरिकांकडून याला कसा प्रतिसाद मिळतो हे येत्या रविवारी स्पष्ट होईल.