घर देश-विदेश 'या' माजी पंतप्रधानांना G20 शिखर परिषदेतील डिनरचे निमंत्रण, यादीत सोनिया गांधी, खर्गेंचा...

‘या’ माजी पंतप्रधानांना G20 शिखर परिषदेतील डिनरचे निमंत्रण, यादीत सोनिया गांधी, खर्गेंचा समावेश नाही

Subscribe

G20 शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. या G20 डिनरसाठी सध्याचे मंत्रिमंडळ, परदेशी प्रतिनिधी खासदार आणि मंत्री यांच्याशिवाय देशातील काही माजी ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे देशाच्या दोन माजी पंतप्रधानांना सुद्धा या डिनरचे निमंत्रण देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेली G20 शिखर परिषद पुढील दोन दिवस नवी दिल्लीत पार पडणार आहे. यासाठी अनेक देशांचे प्रमुख हे भारतात दाखल झाले आहे. अमेरितकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे देखील या परिषदेसाठी आज (ता. 08 सप्टेंबर) संध्याकाळी भारतात दाखल झाले आहेत. या शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. या G20 डिनरसाठी सध्याचे मंत्रिमंडळ, परदेशी प्रतिनिधी खासदार आणि मंत्री यांच्याशिवाय देशातील काही माजी ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे देशाच्या दोन माजी पंतप्रधानांना सुद्धा या डिनरचे निमंत्रण देण्यात आले आहे. (G20 summit dinner invitation to ‘these’ ex-PMs, list excludes Sonia Gandhi, Kharge)

हेही वाचा – भारत – पाकिस्तान यांच्यात लवकरच क्रिकेट सामने? पाक दौऱ्यावरून परतलेल्या BCCI अध्यक्षांना विश्वास

- Advertisement -

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांनाही G20 शिखर परिषदेच्या डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हे दोन्ही माजी पंतप्रधान डिनरला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे प्रमुख नेते जी-20 परिषदेत सहभागी होणार आहेत. भारताची राजधानी दिल्लीत या परिषदेची संपूर्ण तयारी झाली आहे. या मेगा इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील मान्यवर दिल्लीत पोहोचले आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी G20 शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या पाहुण्यांसाठी डिनरचे आयोजन केले आहे. यासाठी सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यमंत्र्यांना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही डिनरचे निमंत्रण देण्यात आले आहे. पाहुण्यांच्या यादीत बड्या उद्योगपतींसह सर्व सचिव आणि इतर विशेष पाहुण्यांचाही समावेश आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांनाही डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे या डिनरसाठी निमंत्रित करण्यात आलेले नाही. तसेच अन्य कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याला निमंत्रण दिलेले नसल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

नितीश कुमार, हेमंत सोरेन, ममता बॅनर्जी, स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, भगवंत मान इत्यादी काही विरोधी मुख्यमंत्री राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या डिनरला उपस्थित राहण्याची माहिती समोर आली आहे. सर्व आमंत्रित पाहुण्यांना उद्या (ता. 09 सप्टेंबर) संध्याकाळी म्हणजे शनिवारी साडेसहा वाजता संसद भवनात पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर या पाहुण्यांना भारत मंडपमपर्यंत नेण्यासाठी आणि परत आणण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी मुव्हमेंट आणि रहदारीवरील निर्बंधांमुळे वाहतुकीची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे कोणत्याही निमंत्रित पाहुण्यांचा ताफा भारत मंडपमपर्यंत जाणार नाही. दिल्ली पोलिसांना सर्व कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री, सचिव आणि इतर विशेष पाहुण्यांना त्यांच्या निवासस्थानातून संसद भवनापर्यंत आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

- Advertisment -