प्रत्येक भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट; पंतप्रधान मोदींनी स्वीकारलं G20 चे अध्यक्षपद

G20 C summit second day india handed over chairmanship of summit pm modi said its pride

इंडोनेशियातील बाली येथे सुरु असलेल्या G20 शिखर परिषदेत आज भारताने अधिकृतपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी इंडोनेशिया यजमान देशाने पुढील वर्षभरासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे सोपवली आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोकोवी विडोडो यांनी G20 चे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वाधीन केले आहे. यावेळी त्यांनी जोकोवी यांचे अभिनंदन करत मोदी म्हणाले की, जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही आमच्या देशातील विविध शहरे आणि राज्यांमध्ये जी -20 परिषदेच्या बैठका आयोजित करू इच्छितो. आमच्या पाहुण्यांना भारतातील आश्चर्यकारक विविधता, सर्वसमावेशक परंपरा आणि सांस्कृतिक समृद्धीचा पूर्ण अनुभव मिळेल. ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ या भारतातील अनोख्या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे. आपण एकत्रितपणे या जी -20 परिषदेला जागतिक बदलासाठी अधिक प्रेरक बनवूया असही आवहनही मोदींनी केले आहे.

जग एकाच वेळी भू-राजकीय तणाव, आर्थिक मंदी, अन्न आणि ऊर्जेच्या वाढत्या किंमती आणि साथीच्या रोगाचे दीर्घकालीन दुष्परिणाम यांच्याशी झुंजत असताना भारत जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारत आहे. अशा वेळी जग जी -20 कडे आशेने पाहत आहे. भारताचे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असेल, अशी खात्री मोदींनी व्यक्त केली आहे.

पुढील एका वर्षात, नवनवीन कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि सामूहिक कृतीला गती देण्यासाठी जी-20 परिषद एक जागतिक मुख्य प्रवर्तक म्हणून काम करेल याची ग्वाही देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. नैसर्गिक स्त्रोतांवर मालकीची भावना आज संघर्षाला जन्म देत आहे आणि हेच पर्यावरणाच्या विनाशाचे मुख्य कारण बनले आहे. पृथ्वी ग्रहाच्या सुरक्षित भविष्यासाठी, विश्वस्तपणाची भावना हा उपाय आहे. ‘लाइफ’ अर्थात ‘पर्यावरणासाठी जीवनशैली’ मोहीम यामध्ये मोठे योगदान देऊ शकते. शाश्वत जीवनशैलीला लोकांची चळवळ बनवणे हा त्याचा उद्देश असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले.

महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्राधान्य 

विकासाचे फायदे सार्वत्रिक आणि सर्वसमावेशक असण्याची आज गरज आहे. आपण विकासाचे फायदे सर्व मानवांना करुणेच्या भावनेने आणि एकजुटीने पोहोचवायचे आहेत. महिलांच्या सहभागाशिवाय जागतिक विकास शक्य नाही. आम्हाला आमच्या जी-20 कार्यक्रम पत्रिकेतही महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्राधान्य द्यायचे आहे. शांतता आणि सुरक्षिततेशिवाय, आपल्या भावी पिढ्या, आर्थिक विकासाचा किंवा तांत्रिक नवकल्पनांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. जी -20 ला शांतता आणि सौहार्दाच्या बाजूने दृढ संदेश द्यायचा आहे. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या संकल्पनेमध्ये हे सर्व प्राधान्यक्रम पूर्णपणे समाविष्ट आहेत, असही मोदी म्हणाले.

इंडोनेशिया कठीण काळातही जी-20 परिषदेलासक्षम नेतृत्व दिले आहे. बालीकडून घोषणापत्र स्वीकारल्याबद्दल मी आज जी-20 समुदायाचे अभिनंदन करतो. जी -20 परिषदेच्या अध्यक्षपदाच्या काळात भारत इंडोनेशियाच्या स्तुत्य उपक्रमांना पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. बाली या पवित्र बेटावर आपण जी-20 अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत आहोत हा भारतासाठी अतिशय शुभ योगायोग आहे. भारत आणि बाली यांचे जुने नाते आहे, अशी भावनीही मोदींनी व्यक्त केली.

मोदींनी सिंगापूरच्या पंतप्रधानांची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाली येथे जी-20 शिखर परिषदेदरम्यान सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांची भेट घेतली. गेल्या वर्षी रोममध्ये झालेल्या जी -20 शिखर परिषदेच्या वेळी ली यांच्याशी झालेल्या भेटीच्या आठवणीला यावेळी पंतप्रधान मोदींनी उजाळा दिला.

भारत आणि सिंगापूर यांच्यातील मजबूत धोरणात्मक भागीदारीची नोंद उभय नेत्यांनी घेतली. सप्टेंबर 2022 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज संमेलनाच्या उद्घाटन सत्राबरोबरच होत असलेल्या नियमित उच्चस्तरीय मंत्री आणि संस्थात्मक संवादांचीही दोन्ही पंतप्रधानांनी दखल घेतली.

फिनटेक, अक्षय ऊर्जा, कौशल्य विकास, आरोग्य आणि औषधनिर्माण क्षेत्रात दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीतील संबंध अधिक विस्तारित करण्याच्या वचनबद्धतेचा दोघांनी पुनरुच्चार केला. भारतात हरित अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि डिजिटलायझेशन यासह विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन भारताने सिंगापूरला केले. तसेच भारताच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा योजना, मालमत्ता मुद्रीकरण योजना आणि गती शक्ती योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठीही भारताने सिंगापूरला आमंत्रित केले आहे.

अलीकडच्या ताज्या जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींवरही बैठकीत विचार विनिमय झाला. भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणातील सिंगापूरच्या भूमिकेचे आणि आसियान-भारत संबंधांसाठी सिंगापूरने बजावलेल्या समन्वयक भूमिकेचे मोदी यांनी कौतुक केले. भारत-आसियान बहुआयामी सहकार्य वाढवण्यासाठी एकत्र काम करण्याच्या इच्छेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला. मोदी यांनी ली यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि पुढील वर्षी भारतात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले.


सनी लिओनी आणि तिच्या पतीला केरळ न्यायालयाकडून दिलासा; फसवणूक प्रकरणातील कारवाईला स्थगिती