नवी दिल्ली: सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील झालेला गोळीबार आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग असलेला मोस्ट वॉण्टेड गॅगस्टर अनमोल बिष्णोई याला अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरातून ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याची सध्या एफबीआयकडून चौकशी सुरु आहे. ही माहिती भारतीय यंत्रणेला देण्यात आली असून ताब्यात घेण्यात आलेला अनमोल बिष्णोई आहे का? याची सध्या शहानिशा सुरू आहे. (Gangster Lawrence Bishnoi’s Brother Anmol Bishnoi Arrested In US)
अनमोल बिष्णोई हा लॉरेन्स बिष्णोईचा लहान भाऊ असून त्याच्या अटकेसाठी एनआयनने 10 लाखांचे बक्षीस घोषित केले आहे. अमेरिकेत ताब्यात घेतलेला आरोपी अनमोल बिष्णोई असल्यास त्याचा ताबा लवकरच भारताला सोपविण्यात येईल असे सांगितले जात आहे. पण, अनमोलला ताब्यात घेण्यात आले किंवा त्याच्यावर अमेरिकेत अटकेची कारवाई झाली आहे का? याबाबत काहीही माहिती देण्यास मुंबई पोलिसांनी नकार दिला आहे. अनमोल बिष्णोई हा मोस्ट वॉण्टेड आरोपी असून त्याच्याविरुद्ध विविध राज्यात 33 हून अधिक गुन्हे दाखल आहे. त्याच्या विरोधात सर्वाधिक गुन्हे राजस्थानात दाखल असून यातील 9 हून अधिक खटल्यात त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले आहे.
2 वर्षापूर्वी बिष्णोई टोळीकडून पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसावाला याची हत्या करण्यात आली होती. या हत्येत अनमोलचा मोठा भाऊ लॉरेन्स बिष्णोईला अटक करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये आहे. यानंतर अनमोल हा गेल्या वर्षी विदेशात पळून गेला होता. काही महिने कॅनडा येथे वास्तव्यास राहिल्यानंतर तो अमेरिकेत पहून गेला होता. गेल्या काही दिवसांपासून तो अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, फ्रेस्नो परिसरात वास्तव्यास होता. 4 ते 5 दिवसापूर्वी याच परिसरातून अमेरिकन तपास यंत्रणेने चौकशीसठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे काही बोगस प्रवासी कागदपत्रे असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे बोलले जाते. गेल्या वर्षी तो कॅलिफोर्नियाच्या पंजाबी लग्नात दिसला होता. या लग्नाचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आले होते. ही माहिती नंतर तेथील पोलिसांना देऊन त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जाते.