घरट्रेंडिंगगौरी लंकेश हत्येप्रकरणी नवा 'खळबळजनक' खुलासा...

गौरी लंकेश हत्येप्रकरणी नवा ‘खळबळजनक’ खुलासा…

Subscribe

गौरी लंकेश यांचा संशयित मारेकरी अमोल काळे, याच्या निशाण्यावर अन्य ३६ लोक असल्याचा खळबळजनक खुलासा समोर आला आहे.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचं हत्या प्रकरण गेल्यावर्षी देशभरात गाजलं होतं. याप्रकरणी आमोल काळे याला संशयित आरोपी म्हणून पकडण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. गौरी लंकेश यांचा संशयित मारेकरी अमोल काळे याच्या डायरीमधून काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. अमोलच्या डायरीतून मिळालेल्या माहितीनुसार गौरी लंकेश यांच्या व्यतिरिक्त अन्य ३६ लोक त्याच्या निशाण्यावर होते. दरम्यान या ३६ जणांपैकी बहुतांशी लोक हे महाराष्ट्रात राहणारे आहेत. तर १० लोक कर्नाटक राज्यातील आहेत. कर्नाटकात राहणारी जे १० लोकं हत्येसाठी निवडण्यात आले होती, ते हिंदू विरोधक असल्याचे संशयित आरोपी अमोलने चौकशीदरम्यान सांगितले.

५० शूटर्सची झालेली निवड…

याशिवाय अमोलच्या डायरीमधून या प्रकरणात सामील असलेल्या अन्य ५० शूटर्सची माहिती समोर आली आहे. या हत्येसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधून एकूण ५० शूटर्सची निवड करण्यात आली होती. यापैकी काही शूटर्सचं बंदूक, पिस्तुल किंवा एअर गन चालवण्यासाठीचं तसंच पेट्रोल बॉम्ब बनवण्यासाठीचं ट्रेनिंगही सुरु होतं. बेळगाव, हुबळी आणि पुणे या शहरांमध्ये अनेक महिन्यांपासून हे ट्रेनिंग सुरु होतं. डायरीमधून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या ३ प्रमुख राज्यात हिंदू समितीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या संमेलनामध्ये ज्याची सर्वात साहसी कामगिरी असते, त्याची शूटर्स म्हणून निवड केली जाते. गौरी लंकेश यांच्यावर गोळी झाडण्याचा आरोप ज्याच्यावर लावण्यात आलेला, त्या परशुराम वाघमारेची निवडही अशाचप्रकारे झाली होती. २०१२ साली विजयपुरामध्ये परशुराम वाघमारेने पाकिस्तानी झेंडा फडकवत तणाव निर्माण केला होता.

- Advertisement -

हत्याप्रकरण आजही धगधगतं…

गेल्यावर्षी ५ डिसेंबर च्या रात्री पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. लंकेश त्यांच्या ऑफिसमधून घरी परतत असताना, बाईकवरुन आलेल्या काही लोकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणामुळे पत्रकारांच्या वारंवार होत असलेल्या हत्या आणि त्यांची सुरक्षितता याचा विषय पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला होता. दरम्यान लंकेश यांचा संशयिक मारेकरी अमोल काळेच्या डायरीमधून समोर आलेल्या या नव्या आणि धक्कादायक बाबींमुळे हे प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -