Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी लवकरच होणार दाखल

टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी लवकरच होणार दाखल

Subscribe

अमेरिकेच्या हिंडेनबर्ग अहवालानंतर भारतीय उद्योजक गौतम अदानी यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. या अहवालामुळे अदानी यांच्या शेअर्स वधारले आणि या गोष्टीचा परिणाम त्यांच्या संपत्तीवर झाला. ज्यामुळे त्यांना टॉप २० श्रीमंतांच्या यादीतून देखील बाहेर पडावे लागले. पण आता लवकरच पुन्हा एकदा अदानी यांचा या यादीत समावेश होणार आहे.

अमेरिकेची संस्था असलेली हिंडेनबर्ग या संस्थेच्या अहवालानंतर टॉप-3 श्रीमंतांच्या यादीत असलेले गौतम अदानी हे श्रीमंतांच्या टॉप-20 मधून देखील बाहेर पडले. हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी यांच्यावर मोठे संकट तर कोसळलेच. या अहवालामुळे त्यांच्या शेअर्सच्या किमतीत तर घसरण झालीच पण यामुळे त्यांना श्रीमंतांच्या यादीतून देखील बाहेर पडावे लागले. परंतु, गेल्या तीन आठवड्यात अदानी यांच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा हळूहळू दर वाढ होत असताना दिसून येत आहे. ज्यामुळे त्यांच्या संपत्तीत देखील वाढ होत आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा अदानी हे श्रीमंतांच्या यादीत दाखल होण्याची शक्यता आहे.

जानेवारी महिन्यामध्ये अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुमारे महिनाभर जोरदार घसरण सुरूच होती. 24 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालात हिंडेनबर्ग यांनी अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. अहवालात अदानी समूहाच्या शेअर्सच्या किंमती खूप जास्त असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय शेअर्सच्या किमतीत फेरफार करण्यासह इतर अनेक आरोपही करण्यात या अहवालाच्या माध्यमातून करण्यात आले होते. या अहवालामुळे अदानीच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती 80 टक्क्यांपर्यंत घसरल्या होत्या. समूहातील 10 सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप 12.06 लाख रुपयांनी घटले. यामुळे गौतम अदानी यांची संपत्ती 40 बिलियन डॉलर्स पेक्षा कमी झाली होती आणि त्यांना अवघ्या एका महिन्यात 80 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले होते.

- Advertisement -

चार महिन्यांपूर्वी हा अहवाल सादर होण्याआधी गौतम अदानी हे टॉप-3 श्रीमंतांच्या यादीत होते. त्यावेळी ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यापासून फक्त एक पाऊल लांब होते. तेव्हा टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क आणि अॅमेझॉनचे जेफ बेझोस फक्त हे दोघे त्यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत होते. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकच्या आकडेवारी अनुसार, अदानी यांची एकूण संपत्ती 31 ऑक्टोबर 2022 मध्ये 143 बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली होती.

दरम्यान, ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीनुसार 27 फेब्रुवारी रोजी गौतम अदानी यांची एकूण संपत्ती फक्त 37.7 बिलियन इतकी होती. पण आता गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 57.5 बिलियन झाली आहे. म्हणजेच गेल्या तीन आठवड्यांत त्यांच्या संपत्तीत सुमारे 20 बिलियन म्हणजेच 52.52 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यासह अदानी आता श्रीमंतांच्या यादीत 21 व्या स्थानावर पोहोचले आहे. अॅलिस वॉल्टन 61.5 अब्ज डॉलरसह 20 व्या स्थानावर आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच अदानी हे पुन्हा एकदा टॉप-20 श्रीमंतांच्या यादीत दाखल होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.


- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकन क्रिकेट लीगमध्ये आयपीएलच्या ४ फ्रँचायझींनी विकत घेतले संघ

- Advertisment -