नवी दिल्ली : हिंडनबर्ग प्रकरण असो किंवा काँग्रेसचे आरोप असो यामुळे सतत चर्चेत असणारे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आता पुन्हा एकदा फसले आहेत. कारण अदानी यांच्यावर अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने गौतम अदानी यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांवर हे आरोप केले आहेत. तसेच, सौर ऊर्जा प्रकल्पासंदर्भात अदानींनी भारतीय अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलरची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेच्या सरकारी संस्थेकडून करण्यात आला आहे. ज्यामुळे आता अदानी यांच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Gautam Adani has been accused of corruption and bribery by US Securities and Exchange Commission)
अमेरिकेतील Securities and Exchange Commission अर्थात एसईसी ही सरकारी संस्था भारतीय सेबीप्रमाणे गुंतवणूकदारांचे हितरक्षण जोपासणारी संस्था आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप या संस्थेकडून करण्यात आलेला आहे. या एसईसीने अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी आणि अझूर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह सिरिल कॅबनेस यांच्यावरही आरोप केले आहेत. या सर्वांनी मिळून सिक्युरिटीजची फसवणूक आणि कट रचण्याचा आरोप एसईसीकडून करण्यात आलेला आहे. त्याशिवाय, अमेरिकन गुंतवणूकदार आणि जागतिक वित्तीय यांच्याकडून निधी मिळविण्यासाठी अदानींकडून खोटी आणि चुकीची माहिती दिल्याचे आरोपामध्ये सांगण्यात आले आहे. भारत सरकारने अदानींच्या कंपन्यांना अब्जावधी डॉलरचे प्रोजेक्ट दिले आहेत. या कंपन्यांना भांडवल मिळविण्यासाठी लाचखोरीची योजना आखण्यात आली होती, असा दावा एसईसीकडून करण्यात आला आहे.
अदानींवर लाचखोरीचा आरोप…
तसेच, अदानी यांनी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा तसेच खोटी विधाने करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. फायदेशीर करार मिळवण्यासाठी अदानी आणि त्यांच्यासोबत इतर सात बड्या अधिकाऱ्यांनी ही लाच दिल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर या प्रकरणी जो तपास सुरू आहे, त्यामध्ये अडथळा आणण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप एफबीआयचे सहाय्यक संचालक जेम्स डेनेही यांनी केला आहे. याबाबत डेप्युटी असिस्टंट ॲटर्नी जनरल लिसा एच मिलर यांनी सांगितले की, भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त लाच देणे, कोट्यवधी डॉलर्स उभारण्यासाठी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलणे आणि तपासात अडथळा आणणे या आरोपांचा समावेश आहे. त्यामुळे आता गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे.