नवी दिल्ली : शोले चित्रपटातील ‘कितने आदमी थे…’ या लोकप्रिय दृष्याचा आधार घेत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. एक गांधी ही काफी है, या शीर्षकाखाली सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीयो क्लिपमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी, घडी घडी ड्रामा करते हैं…, असे मोदी यांना उद्देशून म्हणताना दाखवले आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
एक गांधी ही काफी है pic.twitter.com/I13gVco2jN
— Congress (@INCIndia) August 21, 2023
भारतीय सिनेसृष्टीत इतिहास घडविणाऱ्या अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार आणि अमजद खान अभिनीत ‘शोले’ चित्रपटाचा पगडा आजही कायम आहे. त्यातील अनेक डॉयलॉग लोकांच्या आजही मुखोद्गत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका करताना गब्बर सिंग (अमजद खान) याचा लोकप्रिय ‘कितने आदमी थे…’ या संवादाचा वापर करत एक Animation film तयार केली आहे. या फिल्ममध्ये गब्बर सिंगच्या भूमिकेत नरेंद्र मोदी यांना दाखविण्यात आले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे त्यांचे ‘साथीदार’ दाखविले आहेत. तर भाजपा नेते संबित पात्रा हे या Animationपटात ‘सांभा’ आहेत.
हेही वाचा – जय शहा BCCIचे सेक्रेटरी हा परिवारवाद नाही का? कन्हैया कुमारांचा प्रश्न
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना रद्द झालेली खासदारकी पुन्हा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ही व्हिडीओ बनविण्यात आला आहे. आपल्या विद्वेषाचे बीज पेरून मी 10 वर्षे राज्यकारभार चालवला. या दहा वर्षांत ना मणिपूरचे ऐकले ना जनतेचे ऐकले, केवळ जुमले ऐकवले असल्याचे पंतप्रधान मोदी सांगतात. या फिल्मच्या अखेरीस आता निवडणूक कधी आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी विचारल्यावर, ‘नौटंकी कहीं के, घडी घडी ड्रामा करते हैं…’ असे म्हणताना राहुल गांधी दाखवले आहेत. भाजपाप्रमाणे काँग्रेसनेही आता सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. काँग्रेसच्या या व्हिडीओला ट्विटरवर सुमारे सव्वातासात जवळपास सव्वालाख व्ह्यूज मिळाले असून 2 हजार 500हून अधिक जणांनी रीट्वीट केले आहे.