‘७५ लाख द्या, नाहीतर किडनी तरी विकू द्या’; निवडणूक आयोगाकडे अजब मागणी

Kishore Samrite give letter to ec
किशोर समरीते यांची निवडणूक आयोगाकडे अजब मागणी

भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा घालून दिलेली आहे. मात्र आयोगाच्या या निर्णयावर मध्य प्रदेशच्या बाळाघाट येथील उमेदवाराने चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. तसेच निवडणूकीच्या प्रचारासाठी मला ७५ लाख द्या, नाहीतर किडनी तरी विकू द्या, अशा मागणीचे पत्रच त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे. किशोर समरीते असे या उमेदवाराचे नाव असून ते समाजवादी पार्टीचे आमदार आहेत.

किशोर समरीते यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला पत्र लिहिताना सांगितले की, “निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त १५ दिवस राहिले आहेत. एवढ्या कमी वेळेत एवढी मोठी रक्कम कशी काय जमा करायची? त्यामुळे निवडणूक आयोगाला विनंती आहे की, आयोगाने मला ७५ लाख द्यावेत किंवा बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. नाहीतर मला किडनी विकण्याची परवानगी द्यावी.”, अशा आशयाचे पत्र जिल्हा निवडणूक अधिकारी दिपक आर्या यांना दिले आहे.

समरीत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझ्या विरोधात निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार हे भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी बराच पैसा गोळा केलेला आहे. मात्र माझ्याजवळ एवढा पैसा नाही. तसेच मला मतदारसंघाचा विकास करायचा आहे. गरिबीचे निर्मुलन करायचे आहे. मात्र निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असणारा पैसा माझ्याजवळ नाही. किशोर समरीते यांनी याआधी लांजी लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे.

मध्य प्रदेशमध्ये देखील चार टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २९ एप्रिल, ६-१२ आणि १९ मे रोजी मध्य प्रदेशात निवडणूक होईल.