World record : भारतात 24 तासात कोरोना रूग्णसंख्या वाढीचा विक्रम, ३ लाख १४ हजार नव्या रूग्णांची भर

globally Corona patient highest growth recorded in india in 24 hours, 3 lakh 14 thousand new patients added
World record : भारतात 24 तासात कोरोना रूग्णसंख्या वाढीचा विक्रम, ३ लाख १४ हजार नव्या रूग्णांची भर

देशात कोरोना संसर्गाचा विळखा अगदी घट्ट होत असून दरदिवसा लाखोच्या घरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. यात कोरोना रुग्णांचा धडकी भरवणारा आकडा समोर येत आहे. गेल्या २४ तासांत जगभरातील सर्वाधिक रुग्ण एकट्या भारतात आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णसंख्येने जगभरातील सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आज ३ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ३ लाख १४ हजार ८३५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २०१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ लाख ७८ हजार ८४१ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आत्तापर्यंत १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आत्तापर्यंत १ कोटी ३४ लाख ५४ हजार ८८० कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात २२ लाख ९१ हजार ४२८ कोरोनाच्या एॅटिव्ह केसेस आहेत. तर आत्तापर्यंत कोरोना संसर्गामुळे १ लाख ८४ हजार ६५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १३ कोटी २३ लाख ३० हजार ६४४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. परंतु दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. या रुग्णालयांमध्ये अपुऱ्या सेवा सुविधा आणि कोरोनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.