गौरवास्पद! भारताला मिळाले दोन ऑस्कर पुरस्कार, नाटू नाटू गाणं ठरलं बेस्ट ओरिजिनल साँग

natu natu

Oscar 2023 | नवी दिल्ली – भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल अशी आनंदाची बातमी समोर येत आहे. ऑस्कर २०२३ मध्ये द एलिफेंट विस्परर्स (The Elephant Whisperers) या माहितीपटाला सर्वोत्तम माहितीपट आणि आरआरआर या दाक्षिणात्य चित्रपटातील नाटू नाटू (Natu Natu) या गाण्याला बेस्ट ओरिजिनल साँग ऑस्कर (Best Original Song Oscar) पुरस्कार मिळाला आहे.

९५ वा ऑस्कर २०२३ पुरस्कार सोहळा आज पार पडत आहे. यामध्ये जगभरातील नामांकित कलाकृती पुरस्कार सोहळ्यासाठी नॉमिनेशन लिस्टमध्ये आहेत. आतापर्यंत अनेक भारतीय चित्रपट, माहितीपट, लघुपट, गाणी आदी क्षेत्रात ऑस्करमध्ये नामांकन मिळवलेलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एक भारतीय माहितीपट सर्वोत्तम ठरला असून एका भारतीय गाण्याला ओरिजनल साँगचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे.


The Elephant Whisperers या ४१ मिनिटाच्या माहितीपटाला सर्वोत्तम माहितीपट पुरस्कार मिळाला आहे. या माहितीपटाच्या निर्मात्या गुनित मोंगा यांनी याबाबत मत व्यक्त करताना म्हटलं की, आम्ही नुकतंच भारतीय प्रोडक्शनसाठी पहिला ऑस्कर मिळवला आहे. दोन महिलांनी हे करून दाखवलं आहे. मी अजूनही चकीत आहे.


सर्वोत्तम माहितीपटाची घोषणा झाल्यानंतर सर्व भारतीयांचं लक्ष लागलं होतं ते आरआरआर चित्रपटाकडे. कारण या चित्रपटाचंही बेस्टर ओरिजनल साँग विभागात नॉमिनेशन मिळालं होतं. या गाण्यावर आज ऑस्करच्या मंचावर अभिनेत्यांनी डान्सही केला. या नृत्याला उपस्थित प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर, हेच गाणं बेस्ट ओरिजनल साँग ठरलं आहे. त्यामुळे भारतीयांच्या शिरपेचात दोन मानाचे तुरे रोवले गेले आहेत.