Goa Election 2022: जाहीरनामे सादर करून गोवेकरांना खोटी आश्वासने दिली जात आहेत – आदित्य ठाकरे

Goa assembly Election 2022 shivsena leader aaditya Thackeray target to bjp
Goa Election 2022: जाहीरनामे सादर करून गोवेकरांना खोटी आश्वासने दिली जात आहेत - आदित्य ठाकरे

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात आज शिवसेनेची प्रचारसभा पार पडली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘गोव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. गोव्यात फाईव्ह स्टार हॉटेल आले, पर्यटक आले, पण सामान्यांच्या घरात पाणी आलं नाही. गोवेकरांचा आवाज मंत्रालयापर्यंत आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनामे सादर करून गोवेकरांना खोटी आश्वासने दिली जात आहेत. पण गेली १० वर्ष कुठे होता? १० वर्ष का केलं नाही? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

नक्की काय म्हणाले आदित्य ठाकरे?

‘गोव्यात आपण सुट्टीवर येतो, तेव्हा आपण बीच बघतो आणि गोव्याची दुसरी बाजू बघत असतो. पण एकीकडे अशी बाजू आहे की, स्थानिक लोकांना घरापर्यंत पाणी पोहोचत नाही आहे. इतके वर्षात गोव्यात फाईव्ह स्टार हॉटेल आले, जागतिक पर्यटक येतात ते सगळीकडे दिसतात. पण आपल्याला गोवेकर आणि त्यांची जी भावना आहे, ही ऐकू कशी येत नाही? हे मला इथल्या राज्यकर्त्यांना विचारायचे आहे. म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी ही शपथ घ्यायची आहे की, येत्या निवडणुकीत शिवसेनेचा विजय होणारच. शिवसेनेचे आमदार असणारचं. शिवसैनिक आमदारांसोबत गोव्यात येतील. ते प्रत्येक गावोगावी आणि घरोघरी जातील आणि जे आवाज मंत्रालयापर्यंत आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत जात नाहीत, ते आवाज ऐकतील,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘जेव्हा १० वर्षसत्तेत असलेले राजकर्ते तुमच्या गाव्यात येतील, तेव्हा त्यांना एकच विचारा, ठिक, तुम्ही आज वचननामा आणताय, जाहीरनामा आणत आहात. आम्ही हे करू, ते करू असे तुम्ही सांगत आहात. केंद्रातून येऊ सांगताय आम्ही इथे काय करू, मग गेले १० वर्ष कुठे होता? १० वर्ष का नाही केलं? केंद्रात पण सत्ता आहे, इथेपण सत्ता आहे. सत्ता वरपासून खालपर्यंत असताना तुम्ही काही करू शकला नाहीत. ती खोटी आश्वासने द्यायला तुम्ही इथे आलात? हे विचारण गरजेचं आहे. म्हणून येत्या निवडणुकीत आता जे आपल्याला करायचं आहे ते एकच आहे, धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. गोव्याची शान धनुष्यबाण’

‘सध्या जो काही गोव्यात विकास होतोय, तो नक्की कॉन्ट्रॅक्टरांचा होतोय की लोकांचा होतोय? असा देखील प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे. आम्ही प्रत्येक निवडणूक नुसती लढणार नाही, तर जिंकणार आणि तुमचा विश्वास आणखी घट्ट होत जाणार. आज आम्ही इथे प्रचारासाठी नाहीतर तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेण्यासाठी आलो आहोत. उद्याचं, नवं गोवा बांधायचं आहे, ते आपल्या आशीर्वादाने बांधायचं आहे,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – Goa Election 2022 : संजय राऊत -नाना पटोलेंची गोव्यात भेट, राऊतांकडून सूचक ट्विट