Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Gold Hallmarking : सोने हॉलमार्किंगबाबत सरकारचे नवे नियम, हॉलमार्किंग नसलेले जुने दागिने...

Gold Hallmarking : सोने हॉलमार्किंगबाबत सरकारचे नवे नियम, हॉलमार्किंग नसलेले जुने दागिने अजूनही ज्वेलर्सला विकू शकता

Related Story

- Advertisement -

देशात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग असणे केंद्र सरकारने १५ जून २०२१ पासून बंधनकारक केले आहे. यामुळे आता कोणत्याही सराफ व्यापाराला विना हॉलमार्कचे दागिने विकता येणार नाहीत. तसेच ज्वेलर्सने नियमांचे पालन न केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर आता सोने दागिने खरेदी किंवा विक्री करताना ग्राहकांनाही नव्या नियम आणि अटींची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे. भारतीय मानक ब्यूरोचे (Bureau of Indian Standards)महासंचालक प्रमोदकुमार तिवारी यांनी आज सोने हॉलमार्किंग बंधनकारक करण्याबाबत आज नव्या नियमांची घोषणा केली आहे.

सोने हॉलमार्किंगबाबत सरकारचे नवे नियम

१) १६ जून २०२१ पासून २५६ जिल्ह्यांत १४, १८ व २२ कॅरेट सोन्याच्या दागिने/ कलात्मक वस्तूंवर हॉलमार्क असेल तर त्या विकण्याची परवानगी.

- Advertisement -

२) देशातील इतर जिल्ह्यांत २०, २३ व २४ कॅरेट सोन्याच्या दागिने/ कलात्मक वस्तूंसाठी हॉलमार्क टप्प्याटप्प्याने बंधनकारक करण्यात येईल.

३) गुणवत्ता नियंत्रण आदेशात पुढीलप्रमाणे आणखी काही मुभा देण्यात आल्या आहेत-
- Advertisement -

१) दागिन्यांच्या विशेष श्रेणी- कुंदन, मिना, पोलकी, जडाऊ (जडाव)
२) दरवर्षी ४० लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असणारे सराफ
३) सोन्याचे घड्याळ व फाउंटन पेन

४) ज्वेलर्सनी एकदाच नोंदणी करायची असून, त्यासाठी त्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

५) मौल्यवान धातूच्या वस्तूंच्या कोणत्याही उत्पादक, आयातदार, वितरक अथवा किरकोळ विक्रेत्यास बीआयएस म्हणजे भारतीय मानके संस्थेकडे नोंदणी करणे बंधनकारक असेल.

६) हॉलमार्किंगच्या प्रक्रियेचे पूर्णपणे संगणकीकरण होणार असून, प्रत्येक कामाचे तारीख व वेळेनुसार सर्व तपशील नोंदवले जाणार आहेत. हॉलमार्कमध्ये सहा अंकी संकेतांक, भारतीय मानक ब्यूरोचा शिक्का आणि शुद्धतेची खूण समाविष्ट असेल. याच्या सॉफ्टवेअरचा आज प्रारंभ झाला आहे.

७) हॉलमार्क नसलेले जुने दागिने अजूनही ज्वेलर्सना किंवा ज्वेलरी दुकानांना विकता येतील. तशा दागिन्यांच्या खरेदीनंतर त्यांचे हॉलमार्किंग अथवा गुणवत्तेची काळजी घेत त्यांपासून नवीन दागिन्यांची निर्मिती, ही जबाबदारी ज्वेलर्सची राहील.

८) नोंदणी न केलेल्या ज्वेलरी दुकाने/ ज्वेलर्सविरोधात ग्राहकांना बीआयएस केअर (BIS Care) नामक ऍपच्या माध्यमातून किंवा भारतीय मानक ब्यूरो (Bureau of Indian Standards) च्या वेबसाईटवर तक्रार नोंदवता येईल.

यापूर्वी सोने खरेदी-विक्री, सोन्याच्या शुद्धतेची परिपूर्ण माहितीसाठी कोणतीही केंद्रीय यंत्रणा अस्तित्वात नव्हती. यामुळे अनेकदा सराफांकडून किंवा ग्राहकांकडून सोन्याच्या व्यवहारात फसवणूक सुरु होती. मात्र हॉलमार्किंगचा (Gold Jewellery Hallmarking) नियम लागू झाल्याने आता सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहारात पारदर्शकता येणार आहे. अर्थात अनेक सराफ प्रामाणिकपणे योग्य त्या सोन्याच्या दागिन्यांचे व्यवहारदेखील करतच होते. हॉलमार्किंगच्या नियमामुळे मात्र आता देश पातळीवर यात सुसूत्रता येणार आहे.


 

- Advertisement -