‘गोष्ट एका पैठणी’ची ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

gosht eka paithnichi

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोच्च मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे आज पुरस्कार जाहीर झाले आहेत. नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, हिंदी, मराठी, कन्नड, पंजाबी, तमिळ, तेलुगू, मणिपुरी यांसह इतर प्रादेशिक भाषांमधीलही पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. (‘Goshta Eka Paithanichi’ wins Best Marathi Film, National Film Awards announced)

मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन मिळावे याकरता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. प्रत्येक विभागासाठी पुरस्कार जाहीर केले जातात. आज जाहीर झालेल्या पुरस्कारामध्ये दिग्दर्शक शांतनू रोडे यांचा ‘गोष्ट एका पैठणीची’ हा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला आहे. तर, “मी वसंतराव…” या सिनेमासाठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला आहे. तर, गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

हिंदी फिचर फिल्म विभागामध्ये तानाजी या चित्रपटाला समग्र मनोरंजन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याच चित्रपटासाठी अजय देवगण यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. तानाजी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा देखील पुरस्कार पटकाविला आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून आशुतोष गोवारीकर निर्मिती संस्थेच्या तुलसीदास ज्युनियर या चित्रपटाला जाहीर झाला आहे.

मराठी चित्रपटांच्या विभागात अमोल गोळे दिग्दर्शित सुमी या चित्रपटाला सर्वोकृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला असून याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर यांना जाहीर झाला आहे. विवेक दुबे दिग्दर्शित ‘फ्युनरल’ या चित्रपटाला सामाजिक समस्येवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे तर ‘गोष्ट एका पैठणीची’ या शंतनू रोडे दिग्दर्शित चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा रौप्य कमळ पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे तर याच चित्रपटासाठी ध्वनी संयोजक अनमोल भावे यांना फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम ध्वनी संयोजनाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

फिचर फिल्म विभागात परीक्षकांतर्फे विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून ‘अवांछित’ आणि ‘गोदाकाठ’ या दोन मराठी चित्रपटांची नावे जाहीर झाली असून अभिनेता किशोर कदम यांना विशेष ज्युरी पुरस्कार घोषित झाला आहे. ‘जून’ या चित्रपटासाठी अभिनेता सिद्धार्थ मेनन यांना विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला आहे.

नॉन फिचर चित्रपटांच्या विभागात मराठी भाषेतील ‘कुंकुमार्चन’ या नॉन-फिचर फिल्म श्रेणीतील चित्रपटाला कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे तर पदार्पणातील विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून  पुण्याच्या एमआयटी संस्था निर्मित ‘परिह’ या चित्रपटाचे नाव जाहीर झाले आहे.

फिल्म्स डिव्हिजनच्या ‘पाबुंग स्याम’ या हाओबाम पबन कुमार दिग्दर्शित मणिपुरी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट साहसी चित्रपटाचा पुरस्कार फिल्म्स डिव्हिजनतर्फे निर्मित ‘व्हिलिंग द बॉल’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे.