घरदेश-विदेशकर्नाटकचा कारभार काँग्रेसच्या ‘हाती’

कर्नाटकचा कारभार काँग्रेसच्या ‘हाती’

Subscribe

शपथविधी सोहळ्याद्वारे विरोधकांच्या एकजुटीचे शक्तिप्रदर्शन

कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये १३५ जागा जिंकत पूर्ण बहुमत मिळवणार्‍या काँग्रेसने शनिवारी येथे आपली सत्ता स्थापन केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोन्ही नेत्यांसोबतच यावेळी आणखी ८ मंत्र्यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांसह विविध विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यावेळी सर्व नेत्यांनी एकत्र विरोधकांच्या एकजुटीचे जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. २२४ सदस्यांच्या विधानसभेत १३५ जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. १३ मे रोजी लागलेल्या निकालात विधानसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळविल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा पेच न सुटल्याने काँग्रेसने अद्याप येथे सत्ता स्थापनेसाठी दावा केला नव्हता. अखेर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा पेच सुटला. सोनिया गांधी यांच्या विनंतीनंतर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाले, तर सिद्धरामय्या यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.

- Advertisement -

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर शनिवारी शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री कर्नाटकमधील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेत १३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले. शनिवारी दुपारी बंगळुरुतील कांतीवीरा स्टेडियमवर पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यादरम्यान राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धरामय्या यांच्यासह सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

…हे उपस्थित
या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उबाठा) खासदार प्रियांका चतुर्वेदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री डी. के. स्टॅलिन, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, माकपचे नेते सीताराम येच्युरी, अभिनेते कमल हसन यांच्यासह विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांची हजेरी होती.

- Advertisement -

…हे अनुपस्थित
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण धाडण्यात आले होते, परंतु ते यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार प्रियांका चतुर्वेदी उपस्थित होत्या. केवळ ठाकरेच नव्हे तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील यावेळी अनुपस्थित राहिल्याने हा एक चर्चेचा विषय बनला. ममता बॅनर्जी यावेळी उपस्थित राहू शकल्या नसल्या तरी टीएमसीचे नेते यावेळी उपस्थित होते, परंतु असे असले तरी भाजपविरोधी आघाडीसाठी आवश्यक असणार्‍या आप, सपा, बसपा, बीआरएस आणि लेफ्टचे नेते अनुपस्थित असल्याने विरोधकांमध्ये अद्याप एकी झाली नसल्यावर शिक्कामोर्तब झाले.

कॅबिनेटमध्ये या मंत्र्यांचा समावेश
डॉ. जी. परमेश्वरा, के. एच. मुनियप्पा, के. जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे (मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र), रामलिंगा रेड्डी आणि जमीर अहमद खान यांनीदेखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

काँग्रेसकडून आश्वासनांची पूर्तता
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या पहिल्या प्रमुख पाच आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पहिल्याच दिवशी पावले उचलली. आश्वासनांच्या पूर्तेतेसाठी नवनियुक्त मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी आदेश काढले. तसेच, पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीपर्यंत या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक घरासाठी २०० युनिटची वीज मोफत, कुटुंबप्रमुख महिलेला प्रति महिना दोन हजार रुपये, बेरोजगार तरुणांना भत्ता, सर्व महिलांना परिवहन विभागाच्या बसमधून मोफत प्रवास आणि दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला १० किलो धान्य मोफत, या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -