(Government scheme) रायपूर : केंद्र तसेच राज्य सरकारांकडून गरीब आणि गरजूंसाठी विविध योजना राबविल्या जातात. पण सिनेअभिनेत्री सनी लिओनीदेखील एका योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना भाजपाशासित राज्य असलेल्या छत्तीसगडमध्ये घडली आहे. एका योजनेअंतर्गत तिच्या कथित बँक अकाऊंटमध्ये दरमहा एक हजार रुपये जमा होत आहेत. आता हा प्रकार उघड झाल्यानंतर जागे झालेल्या सरकारने याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. (Fake bank account created in the name of Sunny Leone for government scheme)
छत्तीसगड सरकारच्या महतारी (माता) वंदन योजनेअंतर्गत विवाहित महिलांना त्यांच्या बँक खात्यात दरमहा एक हजार रुपये पाठवले जातात. मात्र ज्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा केली जात होती, त्यापैकी एक खाते सनी लिओनीच्या नावावर असल्याचे उघड झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तिच्या नावाने बनावट खाते तयार केले होते. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले असून बस्तर जिल्हा प्रशासनाने दोषींवर एफआयआर नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा – SS UBT Vs BJP : मोदी-शहा-फडणवीसांनी न्याय अधिकारांची नाकाबंदी केली, ठाकरे गटाचा घणाघात
सनी लिओनीच्या नावावर खाते उघडणाऱ्या आणि ऑपरेट करणाऱ्या व्यक्तीचे नाव वीरेंद्र जोशी आहे. याचअनुषंगाने महतारी वंदन योजनेच्या पात्र लाभार्थींची पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही माहिती सरकार घेत आहे. छत्तीसगड सरकारच्या वेबसाइटनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या बस्तरच्या तालूर अंगणवाडीमध्ये अर्ज करण्यात आला होता. सनी लिओनी, पती जॉनी सिन्स यांचा नोंदणी क्रमांक MVY006535575 अंगणवाडी आणि पर्यवेक्षकांनी अटेस्टेड केले आहे. यावर्षी मार्चपासून त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खाते क्रमांक xxxxx76531मध्ये दरमहा 1000 रुपये जमा केले जात असून या महिन्यातही त्यांच्या खात्यात एक हजार रुपये जमा झाले असल्याचे वृत्त एका वेबसाइटने दिले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व रक्कम वसूल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी हरीश एस. यांनी महिला आणि बालविकास विभागाला केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. (Government scheme: Fake bank account created in the name of Sunny Leone for government scheme)
हेही वाचा – SS UBT Vs BJP : मोदी-शहा-फडणवीसांनी न्याय अधिकारांची नाकाबंदी केली, ठाकरे गटाचा घणाघात