गुजरातमध्ये एटीएसकडून मोठी कारवाई, मुंद्रा बंदरातून ड्रग्जचा साठा जप्त

गुजरातमध्ये एटीएसकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातून ड्रग्जची मोठी जप्त करण्यात आली आहे. तसेच ही खेप मध्यपूर्वेतून भारतात आणण्यात येत होती, अशा माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी देखील सीमा सुरक्षा दलाने चार पाकिस्तानी मच्छिमारांना अटक केली होती आणि गुजरातच्या किनाऱ्याजवळून १० मासेमारी नौका सुद्धा जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र, या कारवाईनंतर आता एटीएसकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरातच्या किनारपट्टीवरील एका जहाजातून २ हजार कोटींहून अधिक किमतीचे ७५० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. तसेच जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुद्धा नऊ पाकिस्तानी नागरिकांसह  २८० कोटी किमतीच्या हेरॉईनची भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न करताना एटीएसने अटक केली होती.

मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यात मुंद्रा बंदरावर ड्रग्ज संदर्भात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली होती. २१ हजार कोटींची ३ हजार किलो वजनाच्या ड्रग्जची खेप जप्त करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण दहशतवादी वित्तपुरवठ्याच्या दृष्टीकोनातून तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेंकडे सोपवण्यात आले होते.

जानेवारी महिन्यात पाकिस्तानी बोटीतून तब्बल २५० कोटी रूपयांचं हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. यावेळी एटीएसकडून जखाऊन बंदराजवळ मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी जवळपास २५० कोटी रूपये किंमतीचे ५० किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते.


हेही वाचा : नवा अशोक स्तंभ आक्रमक आणि रागीट, राष्ट्रीय चिन्हाचा अपमान झालाय; तृणमूलच्या खासदाराची मोदींवर टीका