हार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिट्ठी

विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला मोठा धक्का

hardik patel

पाटीदार समाजाचे नेतृत्व करणार्‍या हार्दिक पटेल यांनी बुधवारी अखेर काँग्रेसला सोडचिट्ठी दिली. हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीआधीच पक्षाला मोठा धक्का बसला आहे. हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. हार्दिक गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्यांवर नाराज होते आणि त्यामुळे ते पक्ष सोडणार असल्याची अटकळ आधीच बांधली जात होती.

अनेक प्रयत्नांनंतरही काँग्रेस पक्षाने देश आणि समाजहिताविरुद्ध काम केल्यामुळे आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे हार्दिक यांनी पत्रात म्हटले आहे. देशातील तरुणांना सक्षम आणि कणखर नेतृत्त्व हवे आहे. परंतु काँग्रेस केवळ निषेधाच्या, विरोधाच्या राजकारणापुरता मर्यादित राहिला आहे. देशातील जनतेला विरोध नाही, तर भविष्याचा विचार करणारा पर्याय हवा आहे, असे देखील हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.

काँग्रेस सोडताना हार्दिक पटेलने ट्विटमध्ये लिहिले की, आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, मला विश्वास आहे की माझ्या या निर्णयाचे प्रत्येक सहकारी आणि गुजरातमधील लोक स्वागत करतील, मला विश्वास आहे की या पावलानंतर माझ्याकडून, मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन, असेही ते म्हणाले.