घरदेश-विदेशकाँग्रेसचा कर्दनकाळ ठरला आप

काँग्रेसचा कर्दनकाळ ठरला आप

Subscribe

गुजरातमध्ये मते खाल्ली, हिमाचलमधील अनुपस्थितीने फायदा

गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने एण्ट्री घेतल्यापासून भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये कडवी टक्कर होणार, अशी भाकिते केली जात होती, परंतु गुजरातमध्ये भाजपने मुसंडी मारत १५६ जागा मिळवून काँग्रेस आणि आपला अक्षरश: धूळ चारली आहे. गेल्या निवडणुकीत गुजरातमध्ये केवळ दोन पक्षांतच थेट लढत असल्याने काँग्रेसने भाजपला टक्कर देत आपले अस्तित्व तरी शाबूत ठेवले होते, परंतु या निवडणुकीत आपच्या घुसखोरीमुळे झालेल्या मतविभागणीचा मोठा फटका काँग्रेसला बसला. दुसरीकडे दिल्ली महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हिमाचल प्रदेशमधून आपने ऐनवेळी माघार घेतली होती. परिणामी मतविभागणी टळून त्याचा अप्रत्यक्षरित्या का होईना काँग्रेसला फायदा झाल्याचे म्हटले जात आहे. गुजरातमध्ये मात्र आप काँग्रेसचा कर्दनकाळ ठरल्याने काँग्रेस नेत्यांकडून होणार्‍या टीकेचा धनी ठरत आहे. आपने दिल्ली ताब्यात ठेवण्यासाठी गुजरातमध्ये भाजपची बी टीम म्हणून काम केल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे.

गुजरातमध्ये २०१७ च्या निवडणुकीत भाजपला ९९ (४९.०५ टक्के मते), तर काँग्रेसला ७७ (४१.४४ टक्के मते) जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला १६ जागांचा फटका आणि काँग्रेसला एवढ्याच जागांचा फायदा झाला होता. काँग्रेसच्या मतांची टक्केवारीही २.५७ टक्क्यांनी वाढली होती, मात्र आपने २०२२ मध्ये गुजरात निवडणुकीच्या रिंगणात उतरत भाजपऐवजी काँग्रेसलाच खिळखिळे करण्याचे काम केले आहे. येथे ५ जागा मिळवत आपने खाते खोलले. एवढेच नाही तर १२.९१ टक्के मतेही खेचली. त्यामुळे काँग्रेसच्या मतांची टक्केवारी कमालीची घटून २७.३ टक्क्यांवर आली आहे.

- Advertisement -

भाजपच्या मतांची टक्केवारी ५२.५ टक्क्यांवर जाऊन पोहचली आहे. गुजरातमधील टक्केवारीच्या आधारे आपचा राष्ट्रीय पक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रदेश काँग्रेसमध्ये असलेल्या नेतृत्वाचा अभाव, पक्षांतर्गत धुसफूस, हार्दिक पटेलसारख्या पाटीदार समाजाच्या नेत्याचे भाजपमध्ये झालेले स्थलांतर यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला शेवटपर्यंत सूर सापडलाच नाही. २०२२ च्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसच्या मतांची आकडेवारी ही २०१७ मध्ये काँग्रेसने एकट्याने मिळवलेल्या टक्केवारी (४०.२१) इतकीच होते. यावरून आपने विकासाचे गाजर दाखवत काँग्रेसची मते फोडण्याचे काम चोखपणे बजावल्याचे दिसते.

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातनंतर हिमाचल प्रदेशकडेही लक्ष केंद्रित केले होते, पण निवडणूक आयोगाने दिल्ली महापालिकेची निवडणूक जाहीर केल्याने आपने अचानक हिमाचलमधून काढता पाय घेतला. तेव्हापासून गुजरात आमचे आणि दिल्ली तुमची अशी भाजपने ऑफर दिल्याची चर्चा रंगू लागली. दिल्ली महापालिकेत आपने भाजपच्या १५ वर्षे जुन्या सत्तेला खिंडार पाडत सत्ता हाती घेतली आहे. काही का असेना हिमाचलमधून आप बाहेर पडल्याने येथे काँग्रेसने ४० जागा मिळवत भाजपला (२५) सत्तेतून खाली खेचले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला येथे २१ आणि भाजपला ४४ जागा मिळाल्या होत्या. २०१७ च्या तुलनेत काँग्रेसची मतांची टक्केवारी ४१.०७ वरून ४३.९१ वर गेली आहे, तर भाजपची मतांची टक्केवारी ४८.८ वरून ४२.९९ वर घसरली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -