घरताज्या घडामोडीCAA कायद्याला पाठिंबा देण्यासाठी शिक्षकांची शालेय विद्यार्थ्यांना धमकी!

CAA कायद्याला पाठिंबा देण्यासाठी शिक्षकांची शालेय विद्यार्थ्यांना धमकी!

Subscribe

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा द्या, नाहीतर तुम्हाला इंटर्नल परीक्षेचे मार्कच मिळणार नाहीत, अशी धमकी गुजरातमधल्या एका शाळेने विद्यार्थ्यांना दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयक अर्थात CAA ला देशभरातून विविध स्तरातल्या लोकांकडून विरोध येऊ लागला आहे. तसेच त्याच्या पाठिंब्यासाठी देखील अनेक घटक सरसावले आहेत. त्यामुळे देशवासियांमध्येच या कायद्यावरून ‘थेट लढत’ होताना पाहायला मिळत असतानाच आता एका शाळेने धक्कादायक प्रकार करून शिक्षण व्यवस्थेला थेट राजकारणाच्या दावणीला बांधल्याचं चित्र पाहायला मिळू लागलं आहे. वास्तविक शाळेमध्ये ज्ञानदानाचं काम होणं अपेक्षित आणि आदर्शवत समजलं जातं. पण गुजरातमधल्या एका शाळेने मुलांना सीएए कायद्याला समर्थन देण्याची तंबीच दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ‘विद्यार्थ्यांनी तसं समर्थनाचं पत्र मोदींना लिहावं आणि नाही लिहिल्यास तुमचे इंटर्नल परीक्षांचे मार्कच मिळणार नाहीत’, असा दमच शाळेनं विद्यार्थ्यांना भरला. सीएएच्या बाजूने किंवा विरोधात, अशा कोणत्याही बाबतीत शाळांकडून विद्यार्थ्यांवर सक्ती कशी केली जाऊ शकते? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. इंडियन एक्सप्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

नक्की काय आहे प्रकार?

ही शाळा अहमदाबादमधली लिटिल स्टार शाळा असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. यानुसार, शाळेतल्या ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे पत्र लिहिण्यास बजावण्यात आलं होतं. या पत्रामध्ये आपण सीएए कायद्याला समर्थन करत असल्याचं नमूद करावं, असं देखील सांगण्यात आलं. तसेच असे पत्र न दिल्यास इंटर्नल परीक्षांचे गुण मिळणार नाहीत, असा दम देखील शाळेतल्या शिक्षकांनी दिला. त्यानुसार विद्यार्थ्यांनी पत्र देखील लिहिली. मात्र, ही बाब पालकांच्या लक्षात येताच पालकांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. हा प्रकार समोर आल्यानंतर लागलीच शाळा प्रशासनाने ही पत्र विद्यार्थ्यांकडून परत मागवली.

- Advertisement -

दरम्यान, ‘या प्रकाराविषयी शाळा प्रशासनाला माहिती नव्हती. मात्र, शाळेतील काही शिक्षकांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे’, असा दावा शाळा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -