Gyanvapi Case: ज्ञानवापी प्रकरणात न्यायालयात पक्षकार होण्याची स्पर्धा, निर्मोही आखाड्यासह या संघटनांचा अर्ज, 4 जुलैला सुनावणी

निर्मोही आखाड्याचे सरचिटणीस राजेंद्र दास यांनी सांगितले होते की, हिंदूंना माँ शृंगार गौरीची नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा आणि निर्मोही आखाड्याला या प्रकरणात पक्षकार बनवावा, ही आमची मागणी आहे.

नवी दिल्लीः वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीशी संबंधित शृंगार गौरीप्रकरणी वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांच्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान हिंदू पक्षकारांकडून याचिका दाखल करण्याची चढाओढ लागली आहे. या प्रकरणात पक्षकार होण्यासाठी विविध संघटनांशी संबंधित लोक न्यायालयात अर्ज दाखल करत आहेत. सोमवारी याप्रकरणी विविध संघटनांकडून 5 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच निर्मोही आखाडा, श्रीकाशी सत्संग मंडळ, केंद्रीय ब्राह्मण महासभा, विश्व हिंदू सेनेच्या वतीने अरुण पाठक, भगवान विश्वेश्वर यांच्या वतीने अधिवक्ता विजय शंकर रस्तोगी यांनी न्यायालयात अर्ज देऊन या प्रकरणात पक्षकार बनविण्याची मागणी केली आहे. जिल्हा न्यायाधीश अजय कृष्णा विश्वेश आणि दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठ विभाग रविकुमार दिवाकर यांच्या न्यायालयात या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

निर्मोही आखाड्याचे सरचिटणीस राजेंद्र दास यांनी सांगितले होते की, हिंदूंना माँ शृंगार गौरीची नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा आणि निर्मोही आखाड्याला या प्रकरणात पक्षकार बनवावा, ही आमची मागणी आहे.

आता 4 जुलै रोजी सुनावणी होणार

ज्ञानवापीशी संबंधित शृंगार गौरीच्या नियमित दर्शन पूजेच्या प्रकरणात सोमवारीही जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात दोन तास वाद झाला. त्यामुळे या प्रकरणात महिनाभरानंतरची तारीख देण्यात आली आहे. देशात मागील 1 महिन्यांपासून वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरू आहे. ज्ञानवापी मशिदीमध्ये नंदी मूर्ती आणि शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरणावरील कोर्टाच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले आहे. कोर्टात सिव्हिल न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांन मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. आदेशनुसार सर्वेक्षणात मशिदीच्या वजूखान्यात शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान याचे व्हिडीओसुद्धा व्हायरल झाले आहेत.

नव्या याचिकेत तीन मागण्या

याचिकेमध्ये तीन महत्त्वाच्या मुद्यांवर सुनावणीची मागणी करण्यात आली होती. ज्ञानवापी मशीद परिसरात मुस्लिमांच्या प्रवेशावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, दुसरे म्हणजे हिंदूंना ज्ञानवापी परिसरात पूजा करण्याचा अधिकार देण्यात यावा आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंदूंना तात्काळ पूजा करण्याचा अधिकार देण्यात यावा. दावा केलेल्या जागेवर शिवलिंग सापडले. आदि विश्वेश्वर यांच्या नावाने राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे.


हेही वाचाः पडळकरांचा ताफा पोलिसांनी अडवला, चौंडीमध्ये पडळकर समर्थक अन् पोलिसांत खडाजंगी