देशात H3N2 इन्फ्लूएंझाचा धोका वाढला, कोरोना रुग्णांची संख्या 5 हजारांच्या वर

देशात H3N2 इन्फ्लूएंझाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजारांच्या वर गेली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मागील 109 दिवसांनंतर देशात कोविड-19 चे पाच हजार सक्रिय रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल(शुक्रवार) एका दिवसात कोरोना विषाणू संसर्गाच्या 796 प्रकरणांची नोंद झाली आहे.

17 मार्चपर्यंत देशात सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजार 26 वर पोहोचली आहे. तसेच पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या 5,30,795 झाली आहे. तर 16 मार्च रोजी एकूण 98,727 कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीचे 220 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

कोरोना आणि H3N2 या नव्या विषाणूची लक्षणे सारखीच आहे. ताप, खोकला, घसा खवखवणे, सर्दी, स्नायू किंवा शरीर दुखणे, डोकेदुखी, थकवा, उलट्या यांसारखे आजार या विषाणूच्या माध्यमातून आढळून येतात.

संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये हा वेग महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिसून आला आहे. गेल्या सात दिवसांत कर्नाटकात 584, केरळमध्ये 520 आणि महाराष्ट्रात 512 नवीन रुग्ण आढळले आहेत. अनेक राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. परंतु साप्ताहिक प्रकरणं अजूनही 100च्या खाली आहेत. दिल्लीतही सात दिवसांत 97 नवीन रुग्णं आढळून आले होते.


हेही वाचा : यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नरेंद्र मोदींना? नोबेल समिती सदस्यांनी दिली ‘हे’ स्पष्टीकरण