चरखी दादरी: आपल्या बँक खात्यात 2000 रुपयेही अचानक आले तर आपल्याला आश्चर्य वाटतं. मात्र तीच रक्कम जर 200 कोटी रुपये असेल तर तुम्हाला धक्का बसेल. असाच काहिसा प्रकार चरखी-दादरीच्या बेरला गावातील विक्रम या मजुराच्या बाबतीत घडला आहे. जेव्हा यूपी पोलीस मजूर विक्रमच्या बेरला गावात पोहोचले तेव्हा त्याला त्याच्या बँक खात्यात पैसे येत असल्याची माहिती मिळाली. यानंतर संपूर्ण कुटुंबात भीतीचं वातावरण आहे. (Harayana 200 Crores repees sent to the bank account of the laborer)
हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील एका मजुराच्या बँक खात्यात कोणीतरी अचानक 200 कोटी रुपये जमा केले. पोलीस चौकशीसाठी विक्रमच्या घरी पोहोचले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे एवढा मोठा व्यवहार पाहून गुजरात पोलिसांनी खातं होल्डवर ठेवलं आहे.
200 कोटी रुपये चर्चेचा विषय
चरखी-दादरीच्या बेरला गावात राहणारा मजूर विक्रम आणि त्याचा चुलत भाऊ प्रदीप यांनी काही गावकऱ्यांकडून त्यांच्या बँक खात्यात 200 कोटी रुपये आल्याचा दावा केला, त्यानंतर तो संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला. मजूर विक्रम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी असाही दावा केला की त्यांच्या घरावर छापा टाकताना यूपी पोलिसांनी त्यांच्या बँक खात्यात 200 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती देऊन त्यांची चौकशी केली. विक्रमचा भाऊ प्रदीप आणि आई बिना देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या खात्यात पैसे आले आहेत ते यश बँकेचे असून ही रक्कम होल्ड करण्यात आली आहे. ही रक्कम कोणी आणि का जमा केली, याची माहिती सध्या कुटुंबीयांना नाही.
बेर्ला येथील रहिवासी असलेला विक्रम आठवी पास असून तो दोन महिन्यांपूर्वी पतौडी परिसरात नोकरीसाठी गेला होता. तेथे तो एक्स्प्रेस-20 नावाच्या कंपनीत कामगार म्हणून रुजू झाला. विक्रमचा भाऊ प्रदीप याने सांगितले की, विक्रमकडून तिथे खाते उघडण्यासाठी कागदपत्रं घेण्यात आली आणि नंतर त्याचं खातं रद्द करण्यात येईल, असं सांगून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. विक्रमने जवळपास 17 दिवस तिथे काम केलं. यूपी पोलीस आल्यानंतर बँकेकडून माहिती घेतली असता विक्रमच्या खात्यात 200 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्याला समजलं की आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर त्याने ट्वीट करून पंतप्रधान मोदींसह आणि मुख्यमंत्री यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ई-मेलवर तक्रार पाठवली आहे. बधरा पोलीस स्टेशन प्रभारी यांनी यासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे डीएसपी अशोक कुमार यांनी या प्रकरणाबाबत मात्र मीडियापासून अंतर ठेवले आहे.
(हेही वाचा: भारत जोडो यात्रेच्या वर्धापनदिनी राज्यभर पत्रकार परिषदा, पदयात्रा व जाहीर सभा )