“… तर त्यालाच देशभक्त म्हणतात”, हार्दिक पटेलांचे जुने ट्विट्स व्हायरल

हार्दिक पटेल यांनी भाजपविरोधी अनेक ट्विट्स केले होते. त्यांचे हे ट्विट्स नेटिझन्सकडून उकरून काढत व्हायरल केले जात आहेत.

पाटीदार आंदोलनाचा चेहरा असलेल्या हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुजरातमध्ये २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपविरोधी (BJP) रणशिंग फुंकले होते. भाजपविरोधी प्रखर प्रचार केल्याने भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत झाली होती. अगदी कमी फरकाने काँग्रेसला त्यावेळी हार पत्कारावी लागली. मात्र, आता हार्दिक पटेल यांनीच हाताची (Congress) साथ सोडून कमळ हाती घेतलं आहे. त्यामुळे त्यांनी याआधी केलेल्या ट्विट्सचा नेटिझन्सकडून खरपूस समाचार घेतला जातोय. भाजपविरोधी केलेले जुने ट्विट्स उकरून काढत हार्दिक पटेल यांना ट्रोल केलं जातंय.

“राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनेतून मी आजपासून एका नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या उदात्त कार्यात मी एक लहान सैनिक म्हणून काम करेन”, असं ट्विट (Tweet) करत आज हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजपच्या राम मंदिर, सीएए, एआरसीसारख्या निर्णयांचं भरभरुन कौतुकही केलं होतं.

१६ डिसेंबर २०१६ रोजी हार्दिक पटेलने देशद्रोह आणि देशभक्तीवरून भाजपवर निशाणा साधला होता. “जर सकाळचा देशद्रोही संध्याकाळी भाजपशी जोडला गेला तर त्याला देशभक्त म्हणतात,” असं ट्विट करत त्यांनी भाजपवर खरमरीत टीका केली होती.

त्यांनी यासारखी अनेक ट्विट्स करत भाजपला धारेवर धरलं होतं. ३० डिसेंबर २०१७ रोजी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, “भाजपमध्ये योग्य लोकांचा सन्मान केला जात नाही. मात्र जे अमित शाहांच्या पायांतील पादत्राणे बनून राहणाऱ्यांना पुढे केलं जातं.”

“योगींनी म्हटलं की गुंडांनी उत्तर प्रदेश सोडावं तर अमित शाह गुजरातमध्ये आले,” असं २९ मार्च २०१७ मध्ये ट्विट करत अमित शाहांवर निशाणा साधला होता.

वरिष्ठ नेते मोबाईलमध्ये व्यस्त

काँग्रेसला रामराम ठोकताना हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र पाठवलं होतं. या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करत काँग्रेसच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्यांनी पत्रात म्हटलंय की, ‘गुजरात आणि गुजरातींबद्दल द्वेष असल्यासारखे पक्षाच्या नेतृत्वाचे वर्तन होते. मी अनेकदा गुजरातमधील समस्यांकडे नेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा जेव्हा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून काही मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईलवर अधिक लक्ष असल्याचे आढळले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे गांभीर्याचा अभाव असल्याचे दिसले.’’